Rashid Khan On India- Australia Offer: अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खान आपल्या फिरकी गोलंदाजीमुळे नेहमीच चर्चेत असतो. ७०० हून अधिक विकेट्स घेऊन त्याने अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. सध्या आयपीएल स्पर्धेत तो गुजरात टायटन्स संघाचा भाग आहे. यावेळी तो आपल्या क्रिकेटच्या मैदानावरील कामगिरीमुळे नव्हे, तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने आपल्या ‘फ्रॉम स्ट्रीट टू स्टारडम’ या पुस्तकात एक मोठा खुलासा केला आहे. रशीद खानला भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांकडून खेळण्याची ऑफर होती. पण त्याने ती ऑफर नाकारली होती. यामागचं कारणही त्याने सांगितलं आहे.

रशीद खानने या कार्यक्रमादरम्यान सांगितलं की, २०२३ मध्ये झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी अफगाणिस्तानातील स्थिती पाहता त्याला भारतात येऊन राहण्याचा आणि इथेच स्थायिक होण्याचा सल्ला देण्यात आला होता. यासह त्याला ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची देखील ऑफर होती. पण रशीद आपल्या मतावर ठाम होता. जर आपल्या देशासाठी नाही खेळू शकलो, तर कुठल्याही देशाकडून खेळणार नाही.

रशीदने या पुस्तकात दोघांमध्ये काय संवाद झाला हे सांगितलं आहे. रशीदने लिहिले, “ते माझ्याकडे आले आणि आमच्यात चर्चा सुरू झाली. त्यावेळी ते म्हणाले की, अफगाणिस्तानातील स्थिती खूप खराब आहे. तू भारतात ये आणि इथेच येऊन रहा आणि इथेच क्रिकेट खेळ. त्यांचं हे बोलणं ऐकून मला धक्का बसला. मला कळतच नव्हतं, त्यांना काय उत्तर देऊ.” पण रशीद हसला आणि म्हणाला, “धन्यवाद, पण मला अफगाणिस्तानकडून खेळायचं आहे.”

रशीदला ऑस्ट्रेलियाकडूनही खेळण्याची ऑफर होती. पण या ऑफरबद्दल त्याने आपल्या पुस्तकात फार काही लिहिलेलं नाही. आपण आपल्याच देशाचं प्रतिनिधित्व करायचं हे त्याने आधीपासून ठरवलं होतं. त्यामुळेच दोन बलाढ्य संघांकडून खेळण्याची ऑफर त्याने नाकारली होती. सध्या तो भारतात असून, आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. आतापर्यंत त्याने ६ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. रशीद खान हा टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. त्याने ५१९ डावात ७०८ गडी बाद केले आहेत.