IPL 2026 Why RCB Wearing Green Jersey: आयपीएल २०२६ मधील रायव्हलरी विकमधील अखेरचे दोन सामने आज १८ एप्रिलला खेळवले जाणार आहेत. यापैकी पहिला सामना आज बंगळुरूमध्ये आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) संघ एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आयपीएल २०२६ सामन्यात त्यांच्या खास हिरव्या जर्सीत मैदानात उतरणार आहेत. पण आरसीबी संघ प्रत्येक वर्षी या हिरव्या जर्सीमध्ये खेळण्यासाठी का उतरतो, काय कारण आहे जाणून घेऊया.
दिल्ली कॅपिटल्स संघाने आरसीबीविरूद्ध सामन्याची नाणेफेक जिंकली आहे आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला. यासह आरसीबीचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आरसीबीच्या कर्णधाराने दिल्लीच्या कर्णधार अक्षर पटेलला ग्रीन जर्सीच्या ग्रीन इनिशिएटिव्ह अंतर्गत रोपट देऊन सुरूवात केली.
आरसीबीची या हिरवी जर्सी ‘ग्रीन इनिशिएटिव्ह’चा भाग असून पर्यावरणपूरक प्रयत्नांना चालना देण्याचा उद्देश आहे. ही पर्यायी जर्सी पुनर्वापरित कापडापासून तयार करण्यात आली असून, संघाच्या पर्यावरणाबद्दलच्या बांधिलकीचं प्रतीक आहे. तसेच, टी-२० क्रिकेटमध्ये कार्बन-न्यूट्रल असणारा RCB हा जगातील एकमेव संघ असल्याचा दावा केला जातो.
२०११ मध्ये एक छोटा उपक्रम म्हणून सुरू झालेली ही कल्पना आता मोठ्या चळवळीत रूपांतरित झाली आहे. आता संघाचा पुढचा उद्देश कार्बन पॉझिटिव्ह होण्याचा आहे. फ्रँचायझीचे CEO राजेश मेनन यांनी सांगितलं की, कार्बन-न्यूट्रल होणं हे अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचं फलित आहे. हिरवी जर्सी ही केवळ प्रतीक नसून, चाहत्यांना आणि भागीदारांना पर्यावरणपूरक सवयी स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्याचं साधन आहे.
“टी-२० फ्रँचायझी म्हणून कार्बन-न्यूट्रल दर्जा मिळवणं हे अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनतीचं फलित आहे. ही हिरवी जर्सी त्या बांधिलकीचं प्रतीक आहे आणि या उपक्रमातून आमचे चाहते व भागीदार अधिक जबाबदार आणि शाश्वत पद्धती अवलंबतील, अशी आम्हाला आशा आहे,” असं मेनन म्हणाले.
या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे सामन्याच्या दिवशी प्रेक्षकांच्या वर्तनाचा अभ्यास करणं. स्टेडियममध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्वेक्षणांद्वारे प्रेक्षकांचे प्रवासाचे पर्याय, कारपूलिंगचे प्रमाण आणि प्रत्येक प्रेक्षकामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा अंदाज घेतला जातो. यामुळे चाहत्यांच्या हालचालींचा पर्यावरणावर होणारा परिणाम अधिक सखोलपणे समजून घेता येतो. स्टेडियमच्या आत, सामना संपल्यानंतरचा भागही तितकाच महत्त्वाचा ठरतो, कचऱ्याचे वर्गीकरण, त्याची योग्य विल्हेवाट आणि सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने होत आहेत याची सतत तपासणी केली जाते.
