Sanju Samson: आयपीएल २०२६ स्पर्धेला येत्या २८ मार्चपासून सुरूवात होणार आहे. गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करणारा संजू सॅमसन आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून आयपीएल स्पर्धेची सुरूवात करणारा संजू सॅमसन पुढे बरेच वर्ष राजस्थान रॉयल्स संघाचा भाग राहिला. मात्र आता तो चेन्नईकडून खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाची साथ का सोडली? याबाबत स्वत: संजू सॅमसनने मोठा खुलासा केला आहे.
आयपीएल २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध होणार आहे. त्यामुळे संजू पहिल्याच सामन्यात आपल्या जुन्या संघाविरूद्ध खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान आगामी हंगामाला सुरूवात होण्यापूर्वी त्याने १७ मार्चला राजस्थान रॉयल्स संघाची साथ का सोडली यामागचं कारण सांगितलं आहे.
संजूने राजस्थान रॉयल्स संघाची साथ का सोडली?
माध्यमांसोबत बोलताना संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स संघाची साथ का सोडली यामागचं कारण सांगितलं आहे. संजू म्हणाला, “राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध खेळण्याची ही पहिलीच वेळ असेल. पण मैदानावर खेळत असताना मी माझ्या भावनांना स्वत:वर वरचढ होऊ देत नाही. मी राजस्थान रॉयल्स संघाची साथ सोडली, कारण मला वाटलं की, संघासोबतचा माझा काळ आता संपला आहे. आाता मी त्या संघाविरूद्ध खेळण्यासाठी उतरलो, तर मी माझा सर्वोत्तम खेळ खेळेन.”
संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळताना राजस्थान रॉयल्सने २०२२ च्या आयपीएल स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला गुजरात टायटन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग बनल्यानंतर संजू सॅमसन आणि एमएस धोनी यांच्यात संवाद झाला होता.
दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं, हे सांगताना संजू सॅमसन म्हणाला, “मी चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळण्यासाठी खूप उत्साहित आहे. माझं माही भाईंसोबत (धोनीसोबत) फोनवर बोलणं झालं. याआधी आम्ही भारतीय संघात एकत्र ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. त्यांच्याशी प्रत्येकवेळी बोलल्यानंतर सकारात्मक ऊर्जा मिळते. यावेळी अनुभव जरा वेगळा असेल. कारण सीएकसेकडून खेळताना मी २ महिने त्यांच्यासोबतच असणार आहे. मी खूप उस्तुक आहे. त्यांना जवळून पाहण्याची आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्याची सुवर्णसंधी असणार आहे.”
