Mohammad Kaif On Rohit Sharma: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून दमदार खेळ पाहायला मिळाला. भारतीय संघाने ही मालिका ३-० ने आपल्या नावावर केली. मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित धावबाद होऊन स्वस्तात माघारी परतला होता. त्यानंतर पुढील सामन्यात तो ४८ धावांवर बाद झाला. तर मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने ७९ धावांची दमदार खेळी केली. या दमदार कामगिरीनंतर रोहितने वर्ल्डकप २०२७ स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याचा दावा आणखी मजबूत केला आहे. रोहित सध्या ३९ वर्षांचा आहे, ज्यावेळी तो वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरणार त्यावेळी त्याचं वय ४० पार असेल. त्यामुळे अनेक क्रिकेट एक्सपर्टला असं वाटतंय की, रोहितने हा वर्ल्डकप खेळू नये. पण माजी भारतीय खेळाडू मोहम्मद कैफने रोहितवर टीका करणाऱ्यांना चांगलच सुनावलं आहे.
रोहित शर्माने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे तो केवळ वनडे क्रिकेटचा भाग आहे. रोहितने गेल्या १० डावात फलंदाजी करताना १ शतक आणि २ वेळा ७५ हून अधिक धावांची खेळी केली आहे. यावरुन तरी हेच दिसतंय की रोहित फॉर्ममध्ये आहे. पण एका डावात फ्लॉप ठरल्यानंतर रोहितला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरु लागते. दरम्यान भारताचा माजी खेळाडू मोहम्मद कैफच्या मते, वय नव्हे, तर फॉर्म पाहून संघात निवड व्हायला हवी.
चेन्नईत झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात रोहितने धावांचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालसोबत मिळून १७० धावांची भागीदारी केली. तर त्याने वैयक्तिक ७९ धावांची खेळी केली. या खेळीनंतर मोहम्मद कैफने आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “मला खरंच समजत नाही की, लोकांना फ्लॉप व्हावा असं का वाटतं? ज्याप्रकारे त्याने आव्हानाचा स्वीकार केला आहे, त्यावरुन तरी हेच दिसतंय की तो यासाठी हकदार आहे.”
तसेच त्याने पुढे लिहिले की, “त्याने भारतीय संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरूद्ध धावा केल्या आणि अफगाणिस्तानविरूद्ध ७९ धावांची खेळी केली. काही कमी धावांच्या खेळीवरुन त्याच्या क्लासचा अंदाज लावता येणार नाही. एक क्रिकेट फॅन म्हणून आपण प्रार्थना करायला हवी की, त्याने २०२७ वर्ल्डकपपर्यंत अशीच फलंदाजी करावी. भारतीय संघाला रोहित आणि विराटच्या अनुभवाची गरज आहे.”
