आयपीएल स्पर्धेत फलंदाज फलंदाजीसाठी जात असताना पंच त्याची बॅट तपासत असल्याचं दिसतं. काही दिवसांपूर्वी मुंबई-बंगळुरू सामन्यादरम्यान माजी कर्णधार रोहित शर्माची बॅटही तपासण्यात आली. या तपासणीवर रोहित शर्मा नाराज दिसला. मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्माने पंचाची मदत केली. रोहितच्या बॅटची पहिली चाचणी अयशस्वी ठरली. दुसरीत मात्र त्याची बॅट योग्य असल्याचं सिद्ध झाले आणि तो खेळायला उतरला.

चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान चेन्नईचा फलंदाज आयुष म्हात्रेची बॅट तपासणीत पार होऊ शकली नाही. आयुष फलंदाजीला जात असताना त्याची बॅट तपासण्यात आली. ती गेजमधून जाऊ शकली नाही. मग दुसऱ्या बॅटची तपासणी करण्यात आली. तीही बॅट गेजमधून जाऊ शकली नाही. तिसरी बॅट मागवण्यात आली मात्र तीही तपासणीत उत्तीर्ण होऊ शकली नाही. या प्रकाराने आयुष पूर्णत: गोंधळून गेला. आयुष सीमारेषेनजीक असूनही खेळायला उतरत नसल्याने चाहत्यांनी त्याच्या नावाचा पुकारा केला. मात्र काही मिनिटात पंचांना चूक लक्षात आली. तपासणीसाठी वापरण्यात येणारं गेज उलट्या दिशेने वापरण्यात आलं होतं. योग्य दिशेने वापरल्यानंतर आयुषची बॅट नियमानुसार असल्याचं स्पष्ट झालं आणि तो खेळायला उतरला.

बॅटची तपासणी का करण्यात येते?

बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार बॅट आणि बॉल यांच्यात एकाला कोणाला अनाठायी फायदा मिळू नये तसंच चाहत्यांना दर्जेदार खेळाची अनुभूती मिळावी. पॉवर हिटिंग विशेषज्ञ फलंदाज तयार होत असण्याच्या काळात बॅटच्या वाढीव आकाराचा फायदा मिळू नये यासाठी बॅटची चाचणी घेण्यात येते.

बीसीसीआयने मैदानावरील पंच तसंच चौथ्या पंचांनी सामन्यादरम्यान कोणतीही बॅट तपासण्याचे अधिकार दिले आहेत. यापूर्वी बॅटची तपासणी ड्रेसिंगरुमपुरती मर्यादित होती. आता हे बॅट चेक मैदानात कुठेही कोणत्याही क्षणी करण्यात येतं.

बॅट तपासणीसाठी काय वापरलं जातं?

बॅट तपासण्याआधी पंचांकडे त्रिकोणी आकाराचं यंत्र देण्यात आलं आहे. नियमानुसार बॅटचं आकारमान किती असावं हे त्यावर लिहिलेलं असतं. बॅट त्यातून यशस्वीरीत्या बाहेर पडली तर फलंदाजांनी त्या बॅटने खेळायला परवानगी देण्यात येते. यापूर्वी इनिंग्ज सुरू होण्यापूर्वी ड्रेसिंगरुममध्ये बॅटची तपासणी होत असे. आता डगआऊटच्या इथे किंवा मैदानातही बॅटची तपासणी करण्यात येते.

खेळाडूने तपासणीसाठी एक बॅट दिली आणि प्रत्यक्षात वेगळ्याच बॅटसह मैदानात खेळायला उतरला असं व्हायला नको म्हणून मैदानात उतरण्याच्या काही क्षण आधी बॅटची तपासणी करण्यात येते. खेळाडूंच्या किटमध्ये अनेक बॅट्स असतात. प्रत्येक बॅटचं वजन, लांबी रुंदी वेगवेगळी असू शकते. बॅटची किनार, ब्लेड हेही वेगवेगळं असू शकतं. आयसीसीने जारी केलेल्या निर्देशानुसार बॅटचं वजन आणि अन्य गोष्टी असणं अनिवार्य आहे.

बॅटसंदर्भात नियम काय आहेत?

बॅटची डेप्थ २.६८ इंचापेक्षा अधिक नसावी
बॅटची रुंदी 4.33 इंचापेक्षा जास्त नसावी.
बॅटच्या कडा १.६१ इंचापेक्षा जास्त नसाव्यात
ज्या भागाने चेंडू मारला जाणार नाही त्या भागाचा आकार ०.२० इंचाच्या आत असावा.

बॅटची तपासणी कठोरपणे लागू करण्यात का आली यासंदर्भात बीसीसीआयने खुलासा केलेला नाही. मात्र काही फलंदाज मोठ्या आकाराच्या बॅट वापरत असल्याचं स्पष्ट झाल्याने बॅट चाचणी कठोरपणे लागू करण्यात आली. टी२० हा अत्यंत वेगवान प्रकार आहे. कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा हे समीकरण प्रमाण झालं आहे. अशावेळी फलंदाजांसाठी बॅट हे प्रमुख अस्त्र आहे. टेस्ट किंवा वनडेत खेळपट्टीवर स्थिरावण्यासाठी थोडा वेळ घेतला जातो. टी२० प्रकारात स्थिरावण्यासाठी वेळच नसतो. पहिल्या चेंडूपासून फटकेबाजीला सुरुवात करावी लागते. बॅटचं वजन जास्त असेल तर अर्धवट बसलेला फटकाही चौकार किंवा षटकार म्हणून जातो. क्रिकेट हा फलंदाज आणि गोलंदाज यांचा एकत्रित खेळ आहे. बॅटच्या माध्यमातून फलंदाजांना अनाठायी फायदा मिळत असेल तर गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरू शकतो. म्हणूनच बॅटच्या तपशीलांचं काटेकोर पालन केलं जातं.

वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने खेळात संतुलितता हवी अशी मागणी केली होती. फटकेबाजीची पद्धत पाहता २० षटकात ३०० धावांचा डोंगर रचल्यास आश्चर्य वाटायला नको.

‘समान संधी मिळावी यासाठीच बॅट तपासणी’

कोणा एकाला अतिरिक्त फायदा मिळतो असं होता कामा नये असं आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं. ‘खेळात समान न्याय मिळावा यासाठी बीसीसीआय आणि आयपीएलने नेहमीच पुढाकार घेतला आहे. वाईड आणि नोबॉलसाठीही रिव्ह्यू पद्धत अंमलात आणली आहे. याकरता खेळाडूंच्या उंचीचा डेटाबेस तयार करण्यात आला. खेळभावना जोपासली जाणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून चाहत्यांना बॅट आणि बॉलमधल्या अस्सल जुगलबंदीचा आस्वाद घेता येईल’, असं धुमाळ म्हणाले.

बॅटचं एकूण वजन तेवढंच ठेऊन स्वीट स्पॉट म्हणजे जिथे चेंडू बॅटवर जिथे बसतो त्या ठिकाणी फुगीरपणा आणण्याचा काही फलंदाजांचा प्रयत्न असतो. स्वीट स्पॉटच्या ठिकाणी अधिक लाकूडमय आणि हँडलपाशी कमी लाकूडमय करायचा त्यांचा प्रयत्न असतो. यामुळे मोठे फटके मारण्यासाठी ताकद मिळते. षटकार चोपण्यासाठी लोकप्रिय फलंदाज बॅटच्या कडेचा भाग फुगीर म्हणजेच दणकट असण्यावर भर देतात. एखादा चेंडू पूर्ण ताकदीने मारला नाही तरी तो चौकार किंवा षटकार जातो. मात्र आता बॅटच्या काटेकोर चाचणीमुळे फलंदाजांना नियमात नमूद केलेल्या आकाराच्या बॅटनेच खेळावं लागेल.

‘बॅटची तपासणी होणं चांगलं’

बॅटचं उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी या चाचणीचं स्वागत केलं आहे. ‘बॅटची निर्मिती झाल्यानंतर त्याची चाचणी घेतली जाते. खेळाडूंच्या बॅटचं एवढं काटेकोर परीक्षण होत नसे. व्हेरीएशनने फार मोठा फरक पडत नाही. सगळ्याच खेळाडूंची बॅट तपासल्या जात आहेत हे चांगलं आहे. मोठ्या आकाराच्या बॅट वापरून फटकेबाजी करण्याला आळा बसेल’, असं सॅन्सपरेल्स ग्रीनलँड्स प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पारस आनंद यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं.

‘बॅट नियमानुसार वापरल्या जात आहेत हे चांगलंच आहे. पण षटकारांची संख्या फक्त बॅटच्या आकाराशी निगडीत नाही. खेळाडू अधिक ताकदवान होत आहेत. ते सातत्याने षटकार लगावण्याचा सराव करतात. षटकार लगावण्यासाठी अनोखे फटके शोधून काढतात’, असंही त्यांनी सांगितलं.

२०१८ मध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बॅट तपासणीचा नियम लागू केला होता. क्रिकेटचे नियम तयार करण्याचं काम मेरलीबोन क्रिकेट क्लबतर्फे करण्यात येतं.

आयपीएल संघांना बॅट तपासणीबाबत कल्पना देण्यात आली आहे. संघांकडेही गेज देण्यात आले आहेत जेणेकरून फलंदाज स्वत:ही बॅटची लांबी, रुंदी नियमानुसार आहे का पाहू शकतात. सामन्याच्या दिवशी चौथे पंच बॅटची तपासणी करतात. तपासणी पार करू न शकलेली बॅट वेगळी ठेवण्यात येते. सामन्यादरम्यान ती वापरता येत नाही. फलंदाजाने नवी बॅट मागवल्यास त्याचीही तपासणी केली जाते. गेल्या वर्षी कोलकाता नाईट रायडर्स संघाचे सुनील नरिन आणि अँनरिक नॉर्किया यांच्या बॅट तपासणीत उत्तीर्ण ठरू शकल्या नव्हत्या.

बॅट मापात नसेल तर काय कारवाई?

बॅट तपासणी पहिल्यांदा अमलात आणणाऱ्या इंग्लंड क्रिकेट बोर्डाने कारवाई देखील केली होती. २०२४ काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये इसेक्स संघाच्या एका खेळाडूने अतिरिक्त आकाराची बॅट वापरली होती. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने इसेक्स संघाचे १२ गुण वजा केले. आयपीएलमध्ये तूर्तास तरी बॅट योग्य आकाराची नसेल तर खेळाडूवर बंदी किंवा आर्थिक दंड अशा शिक्षा करण्यात येत नाही. योग्य आकारमानात नसलेली बॅट खेळाडूला वापरता येत नाही.