Why Sunrisers Leeds Bought Pakistani Spinner: द हंड्रेड २०२६ च्या लिलावादरम्यान सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी फिरकी गोलंदाज अबरार अहमदला करारबद्ध केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. काव्या मारनच्या फ्रँचायझीच्या या निर्णयावर जोरदार टीका झाली आहे. भारतीय मालकीचे संघ पाकिस्तानी खेळाडूंसाठी बोली लावणार नाहीत अशा बातम्या आल्या होत्या, परंतु इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) स्पष्ट केलं की ‘द हंड्रेड’ मध्ये कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला स्थान नाही. पण आता संघाने अबरार अहमदला संघात का घेतलं, याबाबत वक्तव्य केलं आहे.
अबरार अहमद व्यतिरिक्त, उस्मान तारिक हा द हंड्रेडमधील संघात करारबद्ध होणारा दुसरा पाकिस्तानी खेळाडू होता आणि त्याला बर्मिंगहॅम फिनिक्सने करारबद्ध केलं होतं. भारतात तीव्र टीका होत असताना सनरायझर्सचे प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी अबरार अहमदच्या निवडीवर भाष्य केलं आहे.
पाकिस्तानच्या अबरार अहमदला संघात सामील केल्याने मोठा गदारोळ
व्हेटोरीने स्पष्ट केलं की संघ आदिल रशीदला घेऊ शकत नव्हता आणि त्यांना लेग-स्पिनरची आवश्यकता होती, म्हणून त्यांनी अबरारची निवड केली. फ्रँचायझीने निवडलेल्या चार-पाच फिरकीपटूंपैकी अबरार हा एक होता. अबरार अहमदच्या समावेशामुळे संघ खूप आनंदी असल्याचं व्हेटोरी म्हणाले.
“आदिल रशीद सुरुवातीपासूनच आमची पहिली पसंती होता, पण जेव्हा तो बाहेर पडला तेव्हा आम्ही स्पष्टपणे विदेशी फिरकी गोलंदाजांकडे वळलो. आम्ही चार-पाच खेळाडूंवर लक्ष केंद्रित केलं होतं आणि अबरार त्यापैकी एक होता आणि त्याला संघात सामील केल्याचा खूप आनंद झाला आहे,” असे डॅनियल व्हेटोरी यांनी गुरुवारी द हंड्रेड लिलाव संपल्यानंतर सांगितले.
व्हेट्टोरी पुढे म्हणाला की, लिलावात उपलब्ध असलेल्या सर्व खेळाडूंचा विचार करूनच आम्ही योजना आखली होती. पाकिस्तानच्या खेळाडूंना संघात न घेण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नव्हती. आमच्यासाठी मुख्य मुद्दा हा होता की कोणता खेळाडू सर्वोत्तम पर्याय ठरेल. आदिल रशीदला घेण्यात अपयश आल्यानंतर आमचं पुढचं प्राधान्य एका फिरकी गोलंदाजाला संघात घेण्याचं होतं. रिशाद हुसैन, उस्मान तारिक आणि अबरार अहमद या तिन्ही खेळाडूंवर आमची नजर होती, असं व्हेटोरी यांनी स्पष्ट केलं.
अबरार अहमदला संघात सामील केल्याने सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकिण काव्या मारन हिला मोठ्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. यानंतर सनरायझर्स लीड्स संघाचं एक्स अकाऊंटदेखील सस्पेंड करण्यात आलं.
