आयपीएल २०२६ मधील पहिला सुपर ओव्हर सामना लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पाहायला मिळाला. अखेरच्या चेंडूवर लखनौला ७ धावांची गरज असताना कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीने षटकार खेचला आणि सामना बरोबरीत आणला. यासह सुपर ओव्हरमध्ये सामना गेला. पण सुपर ओव्हरमध्ये सुनील नरेनच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर लखनौने केकेआरला विजयासाठी फक्त २ धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान रिंकूने पहिल्या चेंडू चौकार मारून पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. पण रिंकू व नरेनची ही कामगिरी त्यांच्या कारकिर्दीत गणली जाणार नाही, यासाठी काय नियम आहे, जाणून घेऊया.
जेव्हा २० षटकांच्या सामन्याचा निकाल लागत नाही, तेव्हा क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर खेळवून निकाल मिळवला जातो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सुपर ओव्हरमध्ये फलंदाजाने केलेल्या धावा आणि गोलंदाजाने घेतलेल्या विकेट्स त्यांच्या खात्यात जमा केल्या जात नाहीत. यामागे काय कारण आहे? ते जाणून घेऊयात.
क्रिकेटमधील सुपर ओव्हरचे हे नियम माहित आहेत का?
लखनौ आणि केकेआर यांच्यात एक सुपर ओव्हर खेळवण्यात आली, ज्यात केकेआरने सामना जिंकला. सुनील नरेनने दोन बळी घेतले आणि रिंकू सिंहने एक चौकार मारला . पण, या धावा आणि बळींची नोंद दोन्ही संघांच्या कारकिर्दीत झालेली नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे सुपर ओव्हरचा वापर सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी केला जातो. एक सामना सहसा २० किंवा ५० षटकांत संपतो, परंतु सुपर ओव्हर केवळ सामना बरोबरीत सुटल्यासच खेळवली जाते, म्हणजेच तिचा वापर केवळ सामन्याचा निकाल ठरवण्यासाठीच केला जातो; त्याचा दुसरा कोणताही उद्देश नसतो.
क्रिकेटमधील हा नियम फुटबॉलसारखाच आहे. ज्याप्रमाणे फुटबॉलमध्ये सामना अनिर्णित राहिल्यास टायब्रेकर असतो, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये सुपर ओव्हर असते. टायब्रेकरमधील गोल संघाचा जय-पराजय ठरवतो; क्रिकेटप्रमाणे हे गोल खेळाडूच्या खात्यात गणले जात नाहीत. या नियमामागील आणखी एक कारण म्हणजे, त्यामुळे खेळाडूंसोबत होणारा भेदभाव टाळता येतो.
२० षटकांच्या सामन्यात प्रत्येक खेळाडूला समान संधी असते. मात्र, सुपर ओव्हरमध्ये फक्त एकच गोलंदाज गोलंदाजी करतो आणि फक्त तीन फलंदाजांना फलंदाजी करण्याची परवानगी असते; बाकीच्यांना संधी दिली जात नाही. सुपर ओव्हरमध्ये न खेळलेल्या खेळाडूंना मिळणारी अन्यायकारक वागणूक टाळण्यासाठी, त्यांची आकडेवारी त्यांच्या खात्यात जोडली जात नाही.
यामागील तिसरं आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, टी-२० क्रिकेट असो किंवा एकदिवसीय सामने, प्रत्येक खेळाडूला ठराविक षटकांची मर्यादा असते. उदाहरणार्थ, टी-२० क्रिकेटमध्ये कोणताही गोलंदाज चार षटकांपेक्षा जास्त गोलंदाजी करू शकत नाही. एकदिवसीय सामन्यांमध्ये, एक गोलंदाज जास्तीत जास्त दहा षटकं टाकू शकतो. पण, जर सुपर ओव्हरची आकडेवारी जोडली, तर टी-२० सामन्यांमध्ये गोलंदाजाला पाच षटकं किंवा एकदिवसीय सामन्यांमध्ये ११ षटकं मिळतात, ज्यामुळे इतर नियमांनुसार त्याची षटके कमी पडतात. हे अन्यायकारक मानले जाते. म्हणूनच हा नियम तयार करण्यात आला.
