Suryakumar Yadav On Axar Patel: भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी अक्षर पटेलकडे आहे. पण टी-२० वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान अक्षर पटेलला प्लेईंग ११ मधून बाहेर करण्यात आलं होतं. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात अक्षर पटेलला प्लेईंग ११ मध्ये स्थान दिलं गेलं नव्हतं. पण त्यानंतर त्याला पुन्हा एकदा संघात स्थान दिलं गेलं होतं. पण संघाबाहेर केल्याचा त्याला प्रचंड राग आला होता. याबाबत सूर्यकुमार यादवने खुलासा केला आहे.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सूर्यकुमार यादवने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील अनुभव सांगितले आहे. संघाचा उपकर्णधार असूनही प्लेईंग ११ मधून बाहेर केल्याने अक्षर पटेलला राग आला होता. सूर्याने त्याची समजूत काढली होती.

सूर्यकुमार यादवने सांगितलं की, प्लेईंग ११ मधून बाहेर केल्यानंतर अक्षर पटेलला प्रचंड राग आला होता. त्याला राग येणं साहजिक होतं. तो एक अनुभवी खेळाडू आहे. आयपीएलमध्ये तो एका संघाचं नेतृत्व करतो. तो रागवला आणि मी त्याची माफी मागितली होती. मी त्याला म्हणालो, माझ्याकडून चूक झाली पण हा संघाने मिळून घेतलेला निर्णय आहे. हा संवाद सोपा नव्हता. पण त्याने हे सकारात्मकरीत्या घेतले आणि आम्ही दुसऱ्या दिवशी यावर चर्चा केली.

तसेच हार्दिक पंड्याबाबत बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “ज्यावेळी आम्ही आशिया चषक स्पर्धा खेळत होतो. त्यावेळी मी हार्दिकला म्हटलं होतं, तू या संघातील सर्वात अनुभवी आणि मॅचविनर खेळाडू आहेस. तू तुझा अनुभव संघातील इतर खेळाडूंसोबत शेअर करायला हवा. तू खेळाडूंसोबत चर्चा करायला हवी. दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सामन्यानंतर सर्वकाही बदललं. हार्दिक आणि मी मिळून सर्व फलंदाजांसोबत दिर्घकाळ चर्चा केली. आपण काय आहोत, आपली ओळख काय आहे. या चर्चेनंतर सर्वकाही बदललं.” दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या सुपर ८ फेरीतील सामन्यात भारतीय फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले होते. पण त्यानंतर पुढील सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. सेमी फायनल आणि फायनलमध्ये भारताने २५० धावांचा पल्ला गाठला.