Suryakumar Yadav On Kuldeep Yadav Controversy: सूर्यकुमार यादवच्या नेतृ्त्वात भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफी उंचावली होती. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा एकतर्फी पराभव केला होता. तर त्याआधी झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्यातही भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. या सामन्यानंतर काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते, ज्यामध्ये सूर्यकुमार यादव हा फिरकी गोलंदाज कुलदीप यादववर संताप व्यक्त करताना दिसून आला होता. आता त्याने त्यावेळी नेमकं काय घडलं होतं, याबाबत खुलासा केला आहे.
पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ६१ धावांनी दमदार विजय मिळवला होता. या सामन्यात कुलदीप यादवकडून सोपा झेल सुटला होता. त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या कुलदीप यादववर संताप व्यक्त करताना दिसून आले होते. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, भारतीय संघात नेमकं काय सुरू आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. आता सूर्यकुमार यादवने मोठा खुलासा केला आहे.
सूर्यकुमार यादवने माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान सूर्याने काही मोठे खुलासे केले. यादरम्यान त्याने कुलदीप यादवचा किस्सा देखील सांगितला. तो म्हणाला, “ज्यावेळी सामना सुरू झाला, त्यावेळी त्याला गोलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे तो दुखी होता, कारण त्यालाही गोलंदाजी करायची होती. मी अक्षर पटेलला गोलंदाजी दिली, त्यानंतर तिलक वर्मा आणि मग हार्दिक पंड्या. तो माझ्याकडे आला आणि म्हणाला, मी कधी गोलंदाजी करू? ज्यावेळी तो लाँग ऑनला क्षेत्ररक्षण करत होता, त्यावेळी झेल घेण्याची संधी निर्माण झाली होती. कुलदीप तो झेल सहज पकडू शकत होता, पण तो खूप हळू धावत गेला.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “त्याने सोपा झेल सोडला, त्यावेळी मला त्याच्यावर खूप राग आला होता. जर त्याने त्यावेळी थोडा आणखी प्रयत्न केला असता, तर झेल पकडू शकला असता. पण त्याने अतिरिक्त प्रयत्न केलाच नाही. सामना झाल्यानंतर ज्यावेळी आम्ही भेटलो, त्यावेळी आम्ही रागात एकमेकांकडे पाहिलं, पण ती मस्करी होती. अहमदाबादला गेल्यानंतर मला रिल बनवावी असं वाटलं.” कुलदीप यादव आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत, त्यामुळे कुठलेही वाद नाहीत.
