Suryakumar Yadav, Ranji Trophy: मुंबई क्रिकेट असोसिएशनने आगामी रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या नव्या हंगामाची सुरुवात केली आहे. मुंबईने आगामी स्पर्धेसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे. या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शार्दुल ठाकूरकडे सोपवण्यात आली आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी युवा फलंदाज आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली आहे. पण भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या सूर्यकुमार यादवला रणजी संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सुत्राने यामागचं कारण सांगितलं आहे.
सूर्यकुमार यादवला रणजी संघात स्थान का नाही मिळालं?
आगामी रणजी हंगामासाठी नवा कर्णधार आणि नव्या उपकर्णधाराची घोषणा करण्यात आली आहे. पण सर्वात अनुभवी खेळाडू सूर्यकुमार यादवचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. यामागचं कारण असं की, सूर्यकुमार यादवने सराव शिबिराला हजेरी लावली नव्हती. त्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सुत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, “मुंबईचा संघ गेल्या एक महिन्यापासून रेड बॉल क्रिकेटचा सराव करत आहे. पण सूर्यकुमार यादव रेड बॉल क्रिकेटपासून दूर आहे. त्याने सराव शिबिराला देखील हजेरी लावली होती. यासह तो गेल्या काही दिवसात रेड बॉल क्रिकेटचा एकही सामना खेळण्यासाठी मैदानात उतरलेला नाही.”
गेल्या १० दिवसांपूर्वी सूर्यकुमार यादवला संपर्क करण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण त्यावेळी त्याच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. त्यानंतर सूर्यकुमार यादवने उपलब्ध असल्याचं सांगितलं. पण निवडकर्त्यांनी त्याच खेळाडूंना संधी देण्याचं ठरवलं, जे गेल्या महिन्याभरापासून सराव करत आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर करून सूर्यकुमार यादवला संघात स्थान देणं चुकीचं ठरलं असतं. त्यामुळेच चंदिगड संघाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादवला मुंबईच्या रणजी संघात स्थान देण्यात आलेलं नाही.
मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघात स्थान मिळालं नाही, म्हणजे सूर्यकुमार यादवला इथून पुढे स्थान मिळणार नाही, असं नाही. तो अजूनही संघात पुनरागमन करू शकतो. पण त्यासाठी त्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आयोजित केल्या जाणाऱ्या क्लब क्रिकेट स्पर्धांमध्ये आपला फॉर्म सिद्ध करावा लागेल. सूर्यकुमार आधीच भारतीय टी-२० संघातून बाहेर झाला आहे. यासह मुंबईला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे मुंबईकडून खेळू शकणार नाही.
