MI Coach Mahela Jayawardene Clarifies Suryakumar yadav Impact Player role: मुंबई इंडियन्सने १४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेरीस स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकला आहे. मुंबईने कोलकाताचा ६ विकेट्ने पराभव करत आयपीएलमधील सर्वात यशस्वी रनचेस आपल्या नावे केला आहे. मुंबई इंडियन्सचा संघ कागदावर खूपच कमाल दिसत होता. त्यामुळे आता कोणकोणाला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार, याची सर्वांना उत्सुकता होती. पण यादरम्यान सर्वांना चकित करणारा निर्णय मुंबईने घेतला. ते म्हणजे सूर्यकुमार यादवला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून ठेवण्यात आलं. आता संघाचे कोच महेला जयवर्धने यांनी यामागचं कारण सांगितलं आहे.

गेल्यावर्षी रोहित शर्मा संपूर्ण सीझन इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला होता. त्यानंतर यावर्षी रोहित जास्तीत जास्त वेळ मैदानावर असेल, असं कोचने सांगितलं. पण यादरम्यान प्लेईंग इलेव्हन जाहीर झाल्यानंतर सूर्यकुमार यादवचा त्यात समावेश नव्हता. तर सूर्या सबस्टीट्यूट खेळाडूंच्या यादीत होता हे पाहून सर्वच जण चकित झाले होते. मुंबईच्या विजयानंतर आता कोच महेला जयवर्धनेने यावर वक्तव्य केलं.

सूर्यकुमार यादवच्या इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्याबाबत कोच काय म्हणालेय़

कोच जयवर्धने म्हणाले, “मला आशा आहे की तुम्ही नको त्या गोष्टी उगाच पसरवणार नाही. त्याच्या ग्रोइनमध्ये थोडा त्रास होत होता. या सामन्यानंतर पुढच्या सामन्यापर्यंत आमच्याकडे ५ दिवसांचा वेळ असणार आहे, त्यामुळे त्याला थोडा अतिरिक्त आराम द्यायचा होता. शेवटी तो ३-४ षटकांसाठी मैदानात जाण्यासाठी तयार होता. हे खेळाडू संपूर्ण हंगामात उपलब्ध असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी आणि संघ व्यवस्थापन जे निर्णय घेतो, ते पूर्णपणे विचारपूर्वक घेतलेले असतात. यामागे इतर कोणताही मुद्दा नाही.” सामना संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत जयवर्धने यांनी ही माहिती दिली.

सूर्या मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर राहिलेले सर्वात मोठं नाव ठरले, कारण हंगामाच्या पहिल्या सामन्यात संघाने तीन पदार्पण करणाऱ्या खेळाडूंना संधी दिली होती. मात्र इम्पॅक्ट सब्सच्या यादीत त्याचं नाव असल्यामुळे तो आपल्या घरच्या मैदानावर खेळणार हे निश्चित होतं. सूर्या जसप्रीत बुमराहच्या जागी इम्पॅक्ट सब म्हणून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ३५ वर्षीय सूर्यकुमारने झटपट १६ धावा करत रन रेट कायम ठेवला.

मुंबई इंडियन्सचा आता पुढील सामना ४ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स संघाविरूद्ध होणार आहे. त्यामुळे या सामन्यात सूर्या मैदानावर उतरणार की इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेत असणार, यावर सर्वांच्या नजरा असतील.