Why Suryakumar Yadav Sacked as India T20I Captain: आगामी टी-२० मालिकेसाठी श्रेयस अय्यरकडे टीम इंडियाचे नेतृत्व सोपवण्याचा मोठा निर्णय घेतला असला, तरी सूर्यकुमार यादवला अचानक या पदावरून का हटवण्यात आलं, याचं कारण आता निवड समितीने सांगितलं आहे. सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढून घेतलं, याचबरोबर टी-२० संघातूनही त्याला ड्रॉप करण्यात आलं आहे. तर तिलक वर्माला संघाचं उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी सूर्याला वगळण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
अवघ्या तीन महिन्यांपूर्वी सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक आपल्या नावे केला. मात्र आता त्याच्याकडून केवळ कर्णधारपदच नाही, तर भारतीय टी-२० संघातील स्थानही काढून घेण्यात आलं आहे. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करताना निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला. भारतीय टी-२० संघाच्या भविष्यातील नियोजनात हा महत्त्वाचा बदल मानला जात असून, पुढील टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने नव्या नेतृत्वाची निवड केली आहे.
सूर्याकडून कर्णधारपद का काढून घेतलं?
अजित आगरकर यांनी स्पष्ट केलं की, हा निर्णय सूर्यकुमार यादव याच्या अलीकडील फॉर्मसोबतच भविष्यासाठी संघ उभारण्याच्या गरजेचा विचार करून घेण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव याच्याबाबत बोलताना आगरकर यांनी हा निर्णय सोपा नसल्याचं मान्य केलं, “सूर्यकुमारबाबतचा निर्णय कठीण होता. त्यामागे त्याचा वैयक्तिक फॉर्म हे एक कारण होतं. तसेच पुढील दोन वर्षांच्या चक्राचा विचार करून आम्हाला वाटलं की हा निर्णय संघाच्या भविष्यासाठी अधिक योग्य ठरेल. श्रेयस या संधीचा पूर्णपणे हकदार आहे.”
अजित आगरकर यांनी श्रेयस अय्यरला कर्णधारपद सोपवण्याच्या निर्णयामागील कारण स्पष्ट करताना सांगितलं की, श्रेयस अय्यर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नेतृत्वगुण दाखवत आहे आणि त्यामुळे तो या भूमिकेसाठी सर्वात योग्य उमेदवार ठरला. “श्रेयसबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या काही वर्षांत त्याने विविध फ्रँचायझींचं नेतृत्व करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने एका संघाला विजेतेपद मिळवून दिलं आणि वैयक्तिक कामगिरीही सातत्यपूर्ण राहिली. माझ्या मते तो विश्वचषक संघात स्थान मिळवण्याच्या खूप जवळ होता आणि कर्णधारपदासाठी सर्वात ठळक दावेदार होता.”
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषकाचं जेतेपद कायम राखलं असलं, तरी फलंदाज म्हणून त्यांची कामगिरी त्यांच्या लौकिकाला साजेशी ठरली नाही. स्पर्धेत त्याने ९ डावांत २४२ धावा केल्या, मात्र त्यांचा स्ट्राइक रेट १३६.७२ इतकाच राहिला. आयपीएल २०२६ हंगामातही सूर्यकुमारला अपेक्षित चमक दाखवता आली नाही. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने १३ डावांत केवळ २७० धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी २०.७६ तर स्ट्राइक रेट १४७.५४ इतका होता. टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सूर्यकुमारच्या तुलनेत ही आकडेवारी निराशाजनक मानली जात आहे.
