Hardik Pandya On IPL Trophies: आयपीएल २०२६ स्पर्धेला येत्या २८ मार्च पासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. तर ५ वेळचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स संघ आपल्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सामना करणार आहे. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने, मुंबई इंडियन्स संघाच्या जर्सीवर एकही स्टार का नाही? यामागचं कारण सांगितलं आहे.
मुंबई इंडियन्स हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. मुंबई इंडियन्सने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना एकूण ५ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. पण मुंबईच्या जर्सीवर एकही स्टार नाही. मुंबई इंडियन्सकडून आयोजित करण्यात आलेल्या द मिक्स कार्यक्रमात बोलताना हार्दिक पंड्या आणि प्रशिक्षक कायरन पोलार्ड यांनी प्रेक्षकांसोबत संवाद साधला. यादरम्यान त्याने मुंबई इंडियन्सच्या जर्सीवर एकही स्टार नसण्यामागचं हटके कारण सांगितलं.
या प्रश्नाचं उत्तर देताना हार्दिक पंड्या म्हणाला, “खरं सांगायचं तर, मुंबई इंडियन्स संघ असा संघ आहे ज्या संघाला आणखी बऱ्याच ट्रॉफी जिंकायच्या आहेत. त्यामुळे जर्सीवर जागा शिल्लक राहणार नाही.” त्यामुळेच मुंबई इंडियन्स संघाच्या जर्सीवर एकही स्टार नाही. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ५ वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या नावे देखील ५ ट्रॉफी जिंकायची नोंद आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या जर्सीवर ५ स्टार आहेत.
