ICC U19 World Cup 2026 Prize Money Rule: भारताच्या युवा संघाने हरारेमध्ये इतिहास घडवला. १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्यांनी इंग्लंडचा १०० धावांनी पराभव केला आणि सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषकाच्या ट्रॉफीवर भारताचं नाव कोरलं. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत ९ गडी गमावून ४११ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडला लक्ष्य गाठता आलं नाही आणि ३११ धावांवर सर्वबाद झाला. पण अंडर-१९ विश्वचषक विजेत्या संघाला आयसीसीकडून बक्षिसाची रक्कम का मिळत नाही, काय आहे कारण?

भारताच्या विजयाचा हिरो १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी होता, ज्याने अंतिम सामन्यात फक्त ८० चेंडूत १७५ धावांची धमाकेदार खेळी केली. वैभवने त्याच्या डावात १५ षटकार आणि १५ चौकार मारले. कर्णधार आयुष म्हात्रेनेही ५१ चेंडूत ५३ धावा केल्या. तर अखेरच्या षटकात कनिष्क चौहानने महत्त्वपूर्ण धावा करत संघाला ४०० धावांचा पल्ला पार केला होता.

१९ वर्षांखालील विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी झाले होते. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, बांगलादेश, इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान, न्यूझीलंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, जपान, अमेरिका, नामिबिया, टांझानिया आणि स्कॉटलंड सहभागी झाले आहेत. या सर्व संघांमधून टीम इंडियाने हे जेतेपद पटकावले होते.

अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेच्या विजेत्या संघाला ICC प्राईज मनी का देत नाही?

अंडर-१९ पुरुष क्रिकेट विश्वचषकात आयसीसीकडून कोणतीही अधिकृत बक्षिसाची रक्कम दिली जात नाही. ही स्पर्धा प्रामुख्याने तरुण खेळाडूंच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आयसीसीकडून भरवली जाते. त्यामुळे विजेत्या संघाला बक्षिसाची रक्कम दिली जात नाही. विजेत्या संघांचे राष्ट्रीय क्रिकेट बोर्ड अनेकदा त्यांच्या खेळाडूंना रोख रक्कम बक्षीस देतात. २०२४ मध्ये भारताच्या विजयानंतर, बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला ३० लाख रुपये बक्षीस दिले. २०२५ च्या महिला १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय महिला संघाला बीसीसीआयने संपूर्ण संघाला ५ कोटी रुपये दिले होते.

अंडर-१९ विश्वचषकाचा उद्देश तरुण क्रिकेटपटू घडवणं हा आहे. या स्पर्धेत खेळाडूंना अनुभव, संधी आणि वरिष्ठ क्रिकेटकडे वाटचाल करण्यासाठीची तयारी यावर भर दिला जातो. बहुतेक अंडर-१९ खेळाडू १८ वर्षांखालील असतात आणि ते व्यावसायिक क्रिकेटपटू नसतात. त्यामुळे स्पर्धेचं विकासात्मक स्वरूप टिकवण्यासाठी आयसीसी थेट रोख बक्षिसे देणे टाळते. आयसीसीकडून सहसा सहभागी क्रिकेट मंडळांना स्पर्धा अनुदान आणि विकास निधी दिला जातो. बीसीसीआय किंवा ईसीबीसारखी मंडळे स्वतंत्रपणे खेळाडूंना बक्षिसे देऊ शकतात, मात्र ते बंधनकारक नसते.