Sunil Gavaskar on Vaibhav Sooryavanshi Weakness: भारतीय क्रिकेटचे दिग्गज आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीतील एक कमकुवत बाजू हेरली आहे, जी आगामी सामन्यांमध्ये विरोधी गोलंदाजांसाठी एक मोठे अस्त्र ठरू शकते. राजस्थान रॉयल्सच्या या युवा सलामीवीराने दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध ९६ धावांची आणखी एक धडाकेबाज खेळी केली. मात्र, अवघ्या ४ धावांनी त्याचं शतक हुकलं. तर एलिमिनेटर सामन्यात देखील तो ९७ धावांवर बाद झाला होता. याबाबत सुनील गावस्कर काय म्हणाले, जाणून घेऊया.
गुजरातविरूद्ध दुसऱ्या एलिमिनेटरमध्ये वैभव सूर्यवंशीने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात संथ अर्धशतक झळकावलं. त्याने ३१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, त्यानंतर त्याने गिअर बदलत आक्रमक फलंदाजी केली आणि पुढील अवघ्या १६ चेंडूत तब्बल ४५ धावा चोपल्या. त्याच्या खेळीत ८ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.
वैभव सूर्यवंशीला या खेळीदरम्यान नशिबाचीही साथ मिळाली. प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर साई सुदर्शनने त्याचा झेल सोडला आणि त्याला जीवदान मिळालं. त्या संधीचा वैभवने पुरेपूर फायदा घेत शानदार खेळी साकारली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या डावाने वैभवचा आणखी एक पैलू सर्वांसमोर आणला. तो केवळ चौकार-षटकारांची आतषबाजी करणारा फलंदाज नाही, तर कठीण परिस्थितीत संघाचा डाव सावरण्याची आणि संकटातून बाहेर काढण्याची क्षमता त्याच्यात आहे, हे त्याने दाखवून दिलं.
वैभव सूर्यवंशी शतकाजवळ येऊन बाद का होतो?
डावखुऱ्या वैभवने संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख मेळ साधत संघाला मजबूत स्थितीत नेलं. त्यामुळे तो फक्त आक्रमक फलंदाज नसून परिस्थितीनुसार खेळ बदलू शकणारा परिपक्व खेळाडू असल्याचंही सिद्ध झालं. या झुंजार खेळीनंतर वैभव शतक झळकावण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता.९६ धावांवर खेळत असताना वैभव सूर्यवंशी अगदी कॉपी पेस्ट केल्याप्रमाणे वेगवान गोलंदाजाच्या गोलंदाजीवर थर्ड मॅनजवळ झेलबाद झाला आणि त्याचं सलग दुसरं शतक हुकलं.
वैभव सूर्यवंशी बाद झाल्यानंतर भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी त्याच्या खेळातील एक कमकुवत बाजू अधोरेखित केली. गावसकर यांच्या मते, नव्वदीत पोहोचल्यानंतर वैभव शॉर्ट-पिच चेंडूंविरुद्ध थोडा असुरक्षित दिसतो. समालोचनादरम्यान गावसकर म्हणाले, “आता सर्व गोलंदाज म्हणत असतील की आम्हाला त्याची एक कमकुवत बाजू सापडली आहे. तो नाईन्टीजमध्ये असताना त्याला शॉर्ट बॉल टाका. त्याआधी शॉर्ट बॉल फारसा त्याच्याविरूद्ध उपयोगी पडणार नाही. पण तो ९०च्या पुढे गेला की शॉर्ट चेंडू टाका, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक ठेवा आणि तुम्हाला त्याची विकेट मिळू शकते.”
दरम्यान, वैभवने खेळलेल्या ९६ धावांच्या शानदार खेळीमुळे त्याने स्पर्धेतील अव्वल फलंदाज म्हणून आपलं स्थान आणखी मजबूत केलं. त्याची सातत्यपूर्ण कामगिरी राजस्थान रॉयल्ससाठी मोठा आधार ठरत आहे.
