Vaibhav Sooryavanshi On His Birthday Celebration: आयपीएल २०२६ स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाला विजयासाठी अवघ्या १२८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि अवघ्या १५ चेंडूत वेगवान अर्धशतकी खेळी केली. या खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने हा सामना ८ गडी राखून आपल्या नावावर केला. या विजयानंतर वैभव सूर्यवंशी काय म्हणाला? जाणून घ्या.
वैभववर ज्यावेळी आयपीएलमध्ये बोली लागली, त्यावेळी तो अवघ्या १३ वर्षांचा होता. ज्यावेळी त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं, त्यावेळी तो अवघ्या १४ वर्षांचा होता. वयाच्या १४ व्या वर्षी त्याने वेगवान शतक झळकावलं होतं. नुकताच त्याने वयाच्या १५ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. १५ व्या वाढदिवसाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला, “केक कापलाच नव्हता, कारण मी लवकर झोपायला गेलो. मी बाहेर फारसं काही केलं नाही. खरं तर केक कापायचं नियोजन होतं. पण चेहऱ्यावर केक फासला जाऊ नये, म्हणून मी लवकर निघून गेलो.”
वैभवने पहिल्या चेंडूपासून चेन्नईच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला. फलंदाजीतील रणनीती बोलताना वैभव म्हणाला, “पावरप्लेच्या षटकांमध्ये आक्रमक फलंदाजी करायची, हा आमचा प्लॅन होता. चेंडू जसा जुना होत गेला, तसा तो बॅटवर व्यवस्थित येऊ लागला. मी आक्रमक क्रिकेट खेळताना बचावात्मक खेळाचा विचार नक्कीच करतो. पण छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना पावरप्लेमध्ये नियंत्रण मिळवणं खूप गरजेचं असतं. जर पावरप्लेमध्ये गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली असती, तर सामना त्यांच्या बाजून झुकला असता.”
राजस्थान रॉयल्स संघात कुमार संगकारा आणि विक्रम राठोडसारखे अनुभवी खेळाडू आहेत. या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा वैभवला चांगलाच फायदा होता. प्रशिक्षकांच्या सल्ल्याबद्दल बोलताना वैभव म्हणाला, “विरोधी संघातील गोलंदाज माझ्यावर आक्रमण करतील, हे प्रशिक्षकांनी मला वेगळं सांगण्याची गरज नव्हती. कारण बाहेर सगळेच ते म्हणत होते. प्रशिक्षकांनी फक्त एकच गोष्ट सांगितली की, त्यांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मी माझ्या नैसर्गिक शैलीने आणि परिस्थितीनुसार खेळावं.”
