Why Vaibahv Sooryavanshi Not Playing Under 19 Cricket: भारतीय अंडर १९ संघ येत्या काही दिवसांत ऑस्ट्रेलियाच्या अंडर १९ संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय अंडर १९ संघाची घोषणा केली आहे. या संघात माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड आणि वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवागला देखील संधी देण्यात आली आहे. पण मग १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान का देण्यात आलेलं नाही? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.
वैभव सूर्यवंशी हा अवघ्या १५ वर्षांचा आहे. त्यामुळे तो १९ वर्षांखालील संघात खेळू शकतो, असं अनेकांना वाटत असावं. पण असं काहीच नाही. बीसीसीआयच्या एका नियमामुळे वैभव १५ वर्षांचा असूनही १९ वर्षांच्या संघात खेळू शकणार नाही. २०१६ मध्ये बीसीसीआयने एक नियम लागू केला होता, तो म्हणजे एक खेळाडू एकाहून अधिक वेळा अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धा खेळू शकत नाही. त्याचं वय कमी असेल, तरीदेखील तो केवळ एकदाच ही स्पर्धा खेळू शकतो. वैभव सूर्यवंशी गेल्या वर्षी झालेल्या अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेत खेळताना दिसून आला होता. त्यामुळे तो पुन्हा एकदा या संघाकडून खेळू शकत नाही. वैभवला झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती.
याआधी नियमामुळे वॉशिंग्टन सुंदर १८ वर्षांचा असूनही तो अंडर १९ वर्ल्डकप खेळू शकला नव्हता. पण काही खेळाडू असे आहेत ज्यांना २ वेळा अंडर १९ वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळाली आहे. सर्फराज खान आणि संदीप शर्मासारख्या खेळाडूंना २ वेळा अंडर १९ वर्ल्डकप खेळण्याची संधी मिळाली आहे.
ऑस्ट्रेलियाचा अंडर १९ संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात १८ सप्टेंबरपासून होणार आहे. या मालिकेतील ५० षटकांचे सामने १८,२१ आणि २३ सप्टेंबरला राजकोटमध्ये खेळवले जाणार आहेत. तर २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान पहिला रेड बॉल मल्टी डे क्रिकेट सामना आणि ५ ते ८ ऑक्टोबरदरम्यान दुसरा मल्टी डे क्रिकेट सामना खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवागची मुलं खेळताना दिसून येणार आहेत. त्यामुळे या युवा खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.
