Shreyas Iyer On Vaibhav Sooryavanshi: भारताचा संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर (India vs Ireland) आहे. दोन्ही संघांमध्ये २ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना बेलफास्टमध्ये सुरु आहे. या सामन्याआधी २ गोष्टी तुफान चर्चेत होत्या, ते म्हणजे सूर्यकुमार यादवला टी-२० संघाच्या कर्णधारपदावरुन काढल्यानंतर हा पहिलाच सामना असणार आहे. तर दुसरीकडे १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला पदार्पण करण्याची संधी मिळणार का? आयपीएल गाजवल्यानंतर त्याला पहिल्याच सामन्यात संधी मिळण्याची शत्यता होती. पण असं काहीच झालेलं नाही. वैभवला पहिल्या सामन्यात पदार्णप करण्याची संधी मिळालेली नाही. नाणेफेकीच्या वेळी श्रेयस अय्यरने त्याला प्लेईंग ११ मध्ये स्थान न देण्यामागचं कारण सांगितलं आहे. (vaibhav sooryavanshi)
बेलफास्टमध्ये सुरु असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक झाल्यानंतर ज्या क्षणाची सर्वच क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण आला. श्रेयसला वैभव सूर्यवंशी प्लेईंग ११ मध्ये आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी श्रेयस अय्यर म्हणाला, “दुर्दैवाने, नाही. तो अप्रतिम आणि स्फोटक फलंदाज आहे. पण आमच्या संघात एकापेक्षा एक अनुभवी खेळाडू आहेत. या खेळाडूंनी गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या अनुभवी खेळाडूंना पाठिंबा देत आहोत. ज्यांनी संपूर्ण हंगामात दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे मला वाटतं की, जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा त्याला संधी मिळेल. पण सध्या आम्ही ३ प्रमुख वेगवान गोलंदाज, १ अष्टपैलू आणि २ फिरकी गोलंदाजांना स्थान दिलं आहे.” (Shreyas iyer on vaibhav sooryavanshi)
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेईंग ११:
आयर्लंड (प्लेइंग इलेव्हन): टीम टेक्टर, रॉस एडेअर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (यष्टीरक्षक/कर्णधार), बेंजामिन कॅलिट्झ, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, लिआम मॅककार्थी, मॅथ्यू हम्फ्रेज, जय मूंद्रा, मॅथ्यू हॉलार्ड
भारत (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा
