Vaibhav Sooryavnashi Debut In Team India: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या एकच नाव तुफान चर्चेत आहे, ते म्हणजे वैभव सूर्यवंशी. १५ वर्षांचा हा मुलगा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नावाजलेल्या गोलंदाजांची अशी धुलाई करतो, जसं गल्ली क्रिकेट सुरु आहे. आयपीएलमध्ये त्याने अनेक दिग्गज गोलंदाजांच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला. ज्यात कमिन्स आणि बुमराहसारख्या अनुभवी गोलंदाजांचा समावेश आहे. या हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. या कामगिरीच्या बळावर त्याला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. पण अजूनही पदार्पणाची संधी देण्यात आलेली नाही. आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत वैभवला पदार्पणाची संधी दिली जाणार अलसल्याची चर्चा रंगली होती. पण या मालिकेत तो बाकावरच बसून राहिला. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यातही त्याचं पदार्पण झालं नाही. यामागचं नेमकं कारण काय? जाणून घ्या.

गौतम गंभीर हा भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षकपद आहे. यादरम्यान भारतीय संघाला अनेक मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पण त्याच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत आशिया चषक स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. गौतम गंभीरने जेव्हापासून भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली आहे, तेव्हापासून त्याने एकाच गोष्टीवर अधिक भर दिला आहे, ते म्हणजे ‘स्टार कल्चर’ पूर्णपणे संपवून टाकायचं. वैभव सूर्यवंशी जेव्हापासून आयपीएल स्पर्धेत चमकला आहे, तेव्हापासून त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. त्याला संघात स्थान दिलं गेलं आहे, पण पदार्पणाची संधी देण्यात आलेली नाही. वैभव हा खास खेळाडू आहे. कारण वयाच्या १५ व्या वर्षी कुठल्याही खेळाडूला भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं. जर वैभवला इतक्या लवकर संघात स्थान दिलं गेलं, तर प्रस्थापित सिस्टीम पूर्णपणे कोलमडेल आणि उर्वरित डोमेस्टिक सर्किटला एक चुकीचा किंवा गोंधळात टाकणारा संदेश जाईल. कारण भारतीय संघात जे खेळाडू आहेत, त्यांनी वर्षानुवर्षे दमदार कामगिरी करून संघात स्थान मिळवलं आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून संघाचा भाग आहेत. त्यामुळे जर अचानक वैभवला संघात स्थान देण्यासाठी कुठल्याही खेळाडूला बाहेर केलं, तर हा त्या खेळाडूवर अन्याय ठरेल.

भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ आणि आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला आहे. २०२६ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी दमदार कामगिरी केली होती. या तिघांपैकी कुठलाही खेळाडू १-२ सामन्यांमध्ये किंवा एखाद्या मालिकेत फ्लॉप ठरला, तरीदेखील त्याला लगेच संघाबाहेर करता येणार नाही. कारण या खेळाडूंनी वर्षानुवर्षे दमदार कामगिरी करुन टीम मॅनेजमेंटचा विश्वास जिंकला आहे.

वैभवला संघात स्थान का दिलं जात नाही?

गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी संभाळल्यानंतर एक सिस्टीम तयार केली आहे. ही सिस्टीम त्याला विस्कळीत होऊ द्यायची नाही. हीच सिस्टम फॉलो करुन भारतीय संघाने टी०२ वर्ल्डकप, आशिया चषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या मोठ्या स्पर्धा जिंकल्या आहेत. भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेटने ही सिस्टम आणि प्रोटोकॉल समजावून सांगितले आहेत.

रायन टेन डोशेट म्हणाला, “तो (वैभव) आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी पूर्णपणे तयार आहे, यात काहीच शंका नाही. पण संजू सॅमसन हा असा खेळाडू आहे, ज्याने ३ महिन्यांपूर्वी भारताला टी-२० वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.” सध्या भारतीय टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे. श्रेयसने देखील स्पष्ट केलं आहे की, वैभवला संघात स्थान देण्यासाठी संघातील पहिल्या पसंतीच्या खेळाडूला संघाबाहेर करणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे वैभवला संधी द्यायची असेल, तर एकतर संजू किंवा अभिषेकपैकी एकाला विश्रांती द्यावी लागेल. नाहीतर मग टीम कॉम्बिनेशनमध्ये बदल करावा लागेल. आता टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.