Vaibhav Suryavanshi: भारताच्या अंडर-१९ संघाने इंग्लंडला पराभूत करत सहाव्यांदा ट्रॉफीवर नाव कोरलं. १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी या सामन्याचा सामनावीर ठरला. भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर अजूनही वैभव सूर्यवंशीच्या या खेळीची चर्चा सुरू आहे. वैभवने अंतिम सामन्यात ८० चेंडूत १७५ धावांची वादळी खेळी करत इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. वैभवच्या या वादळी खेळीनंतर त्याला अजूनही सिनियर संघात संधी मिळालेली नाही. पण बीसीसीआयची इच्छा असली तरी ते त्याला पदार्पणाची संधी देऊ शकणार नाही, काय आहे कारण?

वैभवने १५ षटकार, १५ चौकार, कमालीचा स्ट्राईक रेट आणि फायनलसारख्या मोठ्या सामन्यात दाखवलेली निर्भीड फलंदाजीने वैभव सूर्यवंशीने पुन्हा चाहत्यांची मनं जिंकली. वैभव हा अंडर-१९ वर्ल्डकपमधील भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. वैभवने अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत ७ सामन्यांमध्ये ४३९ धावा केल्या. यासह तो विश्वचषक स्पर्धेतील सर्वाेत्तम खेळाडूही ठरला.

अंडर-१९ वर्ल्डकप फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीने ८० चेंडूंत १७५ धावांची वादळी खेळी केली. मात्र, तरीही त्याला सध्या भारताच्या सीनियर संघात खेळता येणार नाही. यामागील सर्वात मोठा अडथळा म्हणजे ICCची किमान वयोमर्यादा धोरण (Minimum Age Policy). २०२० मध्ये लागू करण्यात आलेल्या या नियमाचा उद्देश तरुण खेळाडूंचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणे हा आहे.

वैभव सूर्यवंशीला अजूनही भारताकडून खेळता का येत नाही?

आयसीसीच्या नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूचे वय किमान १५ वर्षे असणं बंधनकारक आहे. वैभव सूर्यवंशीचा जन्म २७ मार्च २०११ रोजी झाला आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये भारताला अंडर-१९ वर्ल्डकप जिंकून देताना तो तांत्रिकदृष्ट्या अजूनही १४ वर्षांचाच आहे. त्याने बिहारकडून कितीही जलद शतकं केली, राजस्थान रॉयल्सकडून IPLमध्ये कितीही गोलंदाजांची धुलाई केली तरी २७ मार्च २०२६ पर्यंत भारतीय निवड समितीचे हात बांधलेलेच राहणार आहेत.

विशेष म्हणजे, सीनियर संघासाठी तो खूपच लहान असला तरी आता त्याचा U19 प्रवासही संपला आहे. BCCIकडून अंडर-१९ वर्ल्डकपसाठी ‘वन-टूर्नामेंट रूल’ लागू करण्यात आला आहे. या नियमानुसार, एकाच खेळाडूला पुन्हा-पुन्हा U19 वर्ल्डकप खेळू दिला जाणार नाही. यामागचा उद्देश म्हणजे नव्या प्रतिभावान खेळाडूंना सातत्याने संधी मिळावी.

वैभव सूर्यवंशीचे विक्रम

  • U19 वर्ल्डकप फायनलचा सर्वोच्च स्कोअर
    इंग्लंडविरुद्ध अंडर-१९ वर्ल्डकप फायनलमध्ये अवघ्या ८० चेंडूंमध्ये १७५ धावा ठोकत फायनलमधील सर्वात मोठी वैयक्तिक खेळी करण्याचा विक्रम.
  • वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम
    २०२६ अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये एकूण ३० षटकार मारत डेवाल्ड ब्रेव्हिसचा जुना विक्रम मोडीत काढला.
  • लिस्ट-ए इतिहासातील जगातील सर्वात तरुण शतकवीर
    वय १४ वर्षे २७२ दिवस असताना लिस्ट-ए क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू.
  • इतिहासातील सर्वात जलद १५० धावा
    विजय हजारे ट्रॉफीत केवळ ५९ चेंडूंमध्ये १५० धावा पूर्ण करत एबी डिव्हिलियर्सचा जागतिक विक्रम मोडला.
  • IPLमधील सर्वात तरुण शतकवीर
    राजस्थान रॉयल्सकडून अवघ्या ३५ चेंडूंमध्ये शतक, वय फक्त १४ वर्षे ३२ दिवस, IPL इतिहासातील सर्वात तरुण शतकवीर.
  • भारत-अ संघासाठी ऐतिहासिक शतक
    युएईविरुद्ध अवघ्या ३२ चेंडूंमध्ये शतक ठोकत भारत-अ संघाकडून टी-२० शतक करणारा पहिला खेळाडू.
  • युथ वनडेमधील सर्वात जलद शतक
    इंग्लंड U19 विरुद्ध ५२ चेंडूंमध्ये शतक, युथ वनडेमधील सर्वात जलद शतकाचा नवा विक्रम.
  • युथ कसोटीमधील ऐतिहासिक कामगिरी
    ५८ चेंडूंमध्ये शतक, भारतीय खेळाडूकडून युथ कसोटीमधील सर्वात जलद, तर जागतिक इतिहासात दुसऱ्या क्रमांकाचे जलद शतक.
  • सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये विक्रम
    नाबाद १०८ धावा करत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात तरुण शतकवीर ठरला.
  • युथ वनडेमधील षटकारांचा मैलाचा दगड
    युथ वनडे क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील १०० षटकार पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज.