Why Vinod Kambli Cried: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या तुफान चर्चेत आहे. एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवणारा विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडीओ सोशल मीडियाव तुफान व्हायरल झाला होता. भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोघांनी एकत्र क्रिकेट खेळायला सुरूवात केली. सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर केले. तर दुसरीकडे टॅलेंट असूनही विनोद कांबळीची कारकिर्द सुरू होताच संपली. दरम्यान १९९६ वर्ल्डकपदरम्यान विनोद काबंळी मैदानावरच रडला होता. नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या.
श्रीलंकेकडून भारतीय संघाचा पराभव
१९९६ वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सेमीफायनलचा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये खेळवला गेला होता. हा सामना इडन गार्डन्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला गेला होता. त्यावेळी हजारो भारतीय क्रिकेट चाहते भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानावर उपस्थित होते. पण हा सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट स्वप्नाहून कमी नव्हता. भारतीय संघाला पराभूत होताना पाहून भारतीय क्रिकेट चाहते संतप्त झाले होते. क्रिकेट चाहत्यांना राग इतका अनावर झाला होता की, त्यांनी मैदानावर बाटल्या फेकल्या आणि स्टँड्स पेटवले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सामन्यात पुढे असलेल्या श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं. या निर्णयानंतर भारतीय खेळाडू खूप नाराज झाले होते. विनोद कांबळीही त्या प्लेईंग ११ चा भाग होता.
सामना रद्द झाल्यानंतर भारतीय खेळाडू खूप नाराज झाले होते. सामना भारतीय संघाच्या हातून निसटला होता. पण ज्यावेळी श्रीलंकेला विजयी घोषित करण्यात आलं, त्यावेळी विनोद कांबळी ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असताना त्याच्या डोळ्यात पाणी होतं. मैदानावर जे काही घडलं ते क्रिकेटसाठी मुळीच चांगलं नव्हतं. भारताचा पराभव आणि वर्ल्डकप जिंकण्याची संधी हातून निसटताना पाहून विनोद कांबळी डोळ्यात अश्रू घेऊन मैदानाबाहेर गेला होता. या घटनेनंतर मार्च हा दिवस भारतीय क्रिकेट इतिहासातील काळा दिवस म्हणून ओळखला जाऊ लागला.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने ५० षटकांअखेर ८ गडी बाद २५१ धावा केल्या होत्या. भारतीय संघाला हा फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ५० षटकात २५२ धावा करायच्या होत्या. पण, भारतीय संघाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. ९८ धावांवर भारतीय संघाला दुसरा धक्का बसला. त्यावेळी सचिन तेंडुलकर बाद होऊन माघारी परतला. इथपर्यंत भारतीय संघ मजबूत स्थितीत होता आणि सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार होता. पण त्यानंतर विकेट्सची रांग लागली. अवघ्या १२० धावांवर भारताचे ८ फलंदाज तंबूत परतले. अवघ्या ३४.१ षटकांचा खेळ पूर्ण झाला. त्यावेळी विनोद कांबळी १० धावा करून क्रिजवर होता. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी स्टँड्सला आग लावली. त्यामुळे सामना तिथेच थांबवण्यात आला.
