आयपीएलच्या काही दिवस आधी होणारी वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धा यंदा जानेवारी महिन्यातच सुरू झाली आहे. ९ जानेवारीपासून सुरू होणारी ही स्पर्धा महिनाभर चालणार आहे. नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियम आणि बडोद्याच्या कोटंबी स्टेडियम इथे स्पर्धेचे सामने होणार आहेत. अचानक या स्पर्धेच्या तारखा का बदलण्यात आल्या? जाणून घेऊया.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नव्या फ्यूचर टूर प्रोग्रॅमची घोषणा केली. फ्यूचर टूर प्रोग्रॅम म्हणजे आयसीसीने पुढच्या ५ वर्षांसाठी कोणत्या देशात कोणत्या स्पर्धा होतील याचं आखलेलं वेळापत्रक. हा एकप्रकारे ढाचा असतो. यानुसार दौऱ्यांची आखणी केली जाते. किरकोळ बदल होऊ शकतात पण मूळ ढाचा तसाच राहतो. या फ्यूचर टूर प्रोग्रॅमअंतर्गत जगभरात विविध देशात होणाऱ्या महिला लीगकरता काही स्वतंत्र दिवस देण्यात आले. जेणेकरून राष्ट्रीय संघांचे दौरे आणि लीगमध्ये खेळणं एकाच वेळी येऊ नये. याव्यतिरिक्त आययीसी वूमन्स वनडे चॅम्पियनशिपचं स्वरुपही विस्तारण्यात आलं आहे.

फ्यूचर टूर प्रोग्रॅमअंतर्गत, वूमन्स प्रीमिअर लीगकरता जानेवारी-फेब्रुवारी हे महिने मुक्रर करण्यात आले आहेत. २०२५-२९ या पाच वर्षांकरता वूमन्स प्रीमिअर लीग याच कालावधीत होईल. भारतीय संघाने वर्ल्डकप जेतेपदावर नाव कोरल्यानंतर महिला क्रिकेटच्या सामन्यांना मागणी वाढली आहे. प्रेक्षकसंख्येत निश्चित वाढ झालेली जाणवते. त्यामुळे वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेच्या सामन्यांनाही उत्तम प्रतिसाद मिळाला अशी आयोजकांची अपेक्षा आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात वातावरण सुखद असतं. पावसाची शक्यता नसते. मैदानं उपलब्ध असतात. प्रेक्षकांनाही सामना पाहताना प्रचंड उकाड्याचा त्रास होत नाही. यामुळेच एप्रिल-मे ऐवजी या दोन महिन्यांचा प्राधान्याने विचार करण्यात आला.

वूमन्स प्रीमिअर लीगचा कालावधी निश्चित झाल्याने बाकी लीगच्या संयोजकांनीही त्यांच्या स्पर्धा आयोजित करणं सोपं झालं आहे. अनेक विदेशी खेळाडूंची विविध लीगमध्ये खेळताना तारांबळ उडते. स्पर्धा एकामागोमाग एक असतात किंवा एकाचवेळी असतात. यामुळे नेमकं कुठे खेळायचं असा प्रश्न उभा राहतो. आता खेळाडूंना या समस्येचा सामना करावा लागणार नाही.

इंग्लंडमध्ये होणारी द हंड्रेड स्पर्धेसाठी ऑगस्टचा महिना देण्यात आला तर ऑस्ट्रेलियातल्या वूमन्स बिग बॅश स्पर्धेसाठी नोव्हेंबर महिना पक्का करण्यात आला आहे. या निर्णयामुळे खेळाडूंना कोणत्या लीगमध्ये खेळायचं हे आधीच ठरवता येईल.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात भारतातच पुरुषांचा टी२० वर्ल्डकप होत आहे. यानिमित्ताने ४ ते ५ प्रमुख मैदानांवर सामने होतील. सराव सामने अन्यत्र खेळवण्यात येतील. स्पर्धा आयसीसीची असली तरी बीसीसीआय स्थानिक यजमान असल्याने स्पर्धा निर्विघ्न पार पडावी यासाठी त्यांचं मनुष्यबळ कार्यरत असेल. वूमन्स प्रीमिअर लीगला जानेवारी-फेब्रुवारी महिना देण्यात आल्याने चाहत्यांनाही सोयीचं झालं आहे. वूमन्स प्रीमिअर लीग संपतोय तोच पुरुषांची टी२० वर्ल्डकप सुरू होत आहे. त्यामुळे चाहत्यांना दररोज दर्जेदार क्रिकेटची मेजवानी अनुभवता येणार आहे. वर्ल्डकपमुळे वूमन्स प्रीमिअर लीग लवकर आयोजित करण्यात आलेली नाही.

याव्यतिरिक्त आयसीसीने वूमन्स वनडे चॅम्पियनशिपचा पसारा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या आवृत्तीत बांगलादेश आणि आयर्लंडचा अलीकडेच समावेश करण्यात आला. आता झिम्बाब्वेलाही या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. झिम्बाब्वेच्या समावेशासह आयसीसीचे सर्व पूर्ण सदस्य स्पर्धेत सहभागी होतील. यात अपवाद अफगाणिस्तानचा असेल. त्यांची महिलांची टीम खेळत नाही.

आयसीसीने टी२० चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आयोजित करण्याचाही निर्णय घेतला आहे. दरवर्षी महिला क्रिकेटची एक मोठी स्पर्धा आयोजित व्हावी असा आयसीसीचा मानस आहे. २०२७ साली ही स्पर्धा होईल तर ऑगस्ट २०२८ मध्ये ऑलिम्पिक तसंच टी२० वर्ल्डकपही असणार आहे. महिला क्रिकेटमध्ये अतिरिक्त गुंतवणूक करण्याचा निर्णयही आयसीसीने घेतला आहे.