पेनचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा!

तीन वर्षांपूर्वी झालेल्या चेंडू फेरफार प्रकरणानंतर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद पेनकडे सोपवण्यात आले.

महिला सह-कर्मचाऱ्याला अश्लील संदेश पाठवल्याचा आरोप मान्य

अनुभवी यष्टीरक्षक-फलंदाज टिम पेनने शुक्रवारी ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. काही वर्षांपूर्वी महिला सह-कर्मचाऱ्याला अश्लील संदेश आणि छायाचित्र पाठवल्याची कबुली देत पेनने हा निर्णय जाहीर केला.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या चेंडू फेरफार प्रकरणानंतर २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद पेनकडे सोपवण्यात आले. त्याच्या काही महिन्यांपूर्वीच पेनने हे कृत्य केल्याचे समजते. आता ८ डिसेंबरपासून इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेला प्रारंभ होणार असतानाच पेनचे ते संदेश अचानक समाजमाध्यमांवर पसरल्याने त्याला नेतृत्वपदाचा राजीनामा देणे भाग पडले आहे. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहणार असल्याचे पेनने सांगितले.

‘‘ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर करताना मला फार दु:ख होत आहे. चार वर्षांपूर्वी एका महिला सह-कर्मचाऱ्याला अश्लील संदेश पाठवल्याचे मी कबुल करतो. माझे कुटुंबीय, जवळचे मित्र आणि ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ संघटनेला मी याविषयी कळवले आहे. माझ्या कृत्यामुळे ज्यांचे हृदय दुखावले गेले, त्या सर्वांची मी माफी मागतो,’’ असे ३६ वर्षीय पेन पत्रकार परिषदेदरम्यान म्हणाला. या वेळी त्याला अश्रू आवरणे कठीण गेले.

‘क्रिकेट टास्मानिया’ संघटनेसाठी कार्यरत असलेल्या ‘त्या’ महिलेने त्या वेळीच यासंबंधी तक्रार केल्याचे समजते. परंतु याकडे गांभीर्याने न पाहिले गेल्याने त्या महिलेने नोकरी सोडली. पेननेही आपल्या कृत्याची कबुली दिली होती. त्यामुळे इतकी वर्षे हे प्रकरण गुलदस्त्यात राहिले.

कमिन्स, लबूशेनचा पर्याय

‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ संघटनेने पेनचा राजीनामा स्वीकारला असून त्याला यापुढेही संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाईल, असे स्पष्ट केले. त्याच वेळी आगामी अ‍ॅशेस मालिकेसाठी उपकर्णधार पॅट कमिन्सकडे नेतृत्व सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. मात्र प्रमुख फलंदाज मार्नस लबूशेनही कर्णधारपदाच्या शर्यतीत अग्रेसर आहे. याशिवाय डेव्हिड वॉर्नर किंवा स्टीव्ह स्मिथ यांच्यावरील नेतृत्वबंदी मागे घेऊन त्यांच्यापैकी एकाला संधी देण्यात येणार का, हे पुढील काही दिवसांतच स्पष्ट होईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wicket keeper batsman tim paine resignation of the captaincy akp

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या