Varun Chakravarthy On Abhishek Sharma: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारतीय संघाने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अमेरिकेचा, तर दुसऱ्या सामन्यात नामिबियाचा एकतर्फी पराभव केला. या दमदार कामगिरीसह भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. भारतीय संघाचा पुढील सामना कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. हा सामना १५ फेब्रुवारीला श्रीलंकेतील कोलंबोत खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचं टेन्शन वाढलं आहे. कारण स्फोटक फलंदाज अभिषेक शर्मा पूर्णपणे फिट नसल्यामुळे नामिबियाविरूद्धच्या सामन्यात खेळू शकला नव्हता. दरम्यान तो पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध राहणार का? याबाबत वरूण चक्रवर्तीने मोठी अपडेट दिली आहे.

भारत आणि नामिबिया या दोन्ही संघांदरम्यान झालेला सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यातील नाणेफेकीच्या वेळी सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माच्या फिटनेसबाबत अपडेट दिली होती. त्याने स्पष्ट सांगितलं होतं की, तो अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे तो १-२ सामने बाहेर राहू शकतो. यावरून असा अंदाज लावला जात होता की, तो पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातून बाहेर होऊ शकतो. पण आता वरूण चक्रवर्तीने दिलेल्या अपडेटनुसार, अभिषेक शर्मा पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळताना दिसू शकतो.

वरूण चक्रवर्ती काय म्हणाला?

भारत आणि नामिबिया यांच्यातील सामना झाल्यानंतर ब्रॉडकास्टर्ससोबत बोलताना वरूण चक्रवर्ती म्हणाला, “माझं अभिषेक शर्मासोबत बोलणं झालं, तो आता ठिक आहे. त्याने आज सराव देखील केला. अभिषेकने मला सांगितलंय की, तो लवकरच पुनरागमन करणार आहे. अभिषेक शर्मा आता फिट झाला असून त्याने सराव कराया सुरूवात केली आहे. पण तो पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अभिषेक शर्मासारखा महत्वाचा खेळाडू पाकिस्तानविरूद्धच्या महत्वाच्या सामन्यातून बाहेर होणं, हा भारतीय संघासाठी मोठा धक्का असू शकतो. कारण तो भारतीय संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. आता वरूण चक्रवर्तीने आनंदाची बातमी तर दिली आहे. पण तो खेळणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

दिल्लीला पोहोचल्यानंतर अभिषेक शर्मा अचानक आजारी पडला होता. त्यामुळे त्याला तातडीने रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. आता त्याला डिस्चार्ज तर मिळाला आहे. पण तो अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. अभिषेक शर्माच्या फिटनेसबाबत अपडेट देताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “अभिषेक अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. तो एक- दोन सामन्यांना मुकणार आहे. त्याच्या जागी संजू सॅमसनचा संघात समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसन देखील आक्रमक फलंदाज आहे. तर सिराजच्या जागी बुमराहला संधी देण्यात आली आहे.” जर अभिषेक शर्मा पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यातूनही बाहेर झाला, तर पुन्हा एकदा संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते.