२०१८ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होता. दोन अव्वल संघांतील द्वंद्वं अनुभवण्यासाठी चाहते सज्ज होते. पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियाने जिंकली तर दुसरी आफ्रिकेने. तिसऱ्या टेस्टमध्ये जे घडलं त्याने क्रिकेटविश्व ढवळून निघालं. तिसऱ्या टेस्टमध्ये जे घडलं त्याने ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटचं अपरिमित नुकसान झालं.

नेमकं काय घडलं होतं?

केपटाऊन टेस्टदरम्यान ऑस्ट्रेलियाचा कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट बॉलचा आकार बदलण्यासाठी त्यावर सँडपेपर घासत असल्याचं स्पष्ट झालं. पॉलिश पेपरप्रमाणे हा पेपर घासल्यामुळे चेंडूला लकाकी मिळेल. टेलिव्हिजन रिप्लेत हे दिसलं. यानंतर मैदानावरील अंपायर्स यांनी हस्तक्षेप केला. बॉलचा आकार आणि स्थिती बदलण्यासाठी सँडपेपरने घासल्याची कबुली बॅनक्रॉफ्टने दिली. हा सगळा प्रकार माहिती होता मात्र ते रोखण्यासाठी काहीही केलं नसल्याचं कर्णधार स्टीव्हन स्मिथने कबूल केलं. सँडपेपर बॉलवर कसा घासावा याबाबत बॅनक्रॉफ्टला सांगितल्याचं डेव्हिड वॉर्नरने सांगितलं.

मॅचरेफरींनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्याचदिवशी स्टीव्हन स्मिथने कर्णधारपदाचा तर डेव्हिड वॉर्नरने उपकर्णधारपदाचा राजीनामा दिला. या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियाची जागतिक क्रिकेटविश्वात नाचक्की झाली. ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांना घडल्या प्रकाराने धक्का बसला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याची गंभीर दखल घेत स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर वर्षभराची बंदी घालण्याचा निर्णय घेतला. या काळात त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट तसंच डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळण्यास मनाई करण्यात आली. सँडपेपरने बॉल घासणाऱ्या बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली.

प्रकरण उघडकीस आल्याचा परिणाम ऑस्ट्रेलियाच्या खेळावर दिसून आला आणि त्यांनी केपटाऊन टेस्ट गमावली. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये वॉर्नर-स्मिथ-बॅनक्रॉफ्ट हे तिघेही नव्हते. ऑस्ट्रेलियाचा या टेस्टमध्ये मानहानीकारक पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेने चार सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली.

स्लेजिंगचा म्हणजेच वंश-धर्म-पंथ-रंग तसंच वैयक्कित आयुष्यासंदर्भात शेरेबाजी करून प्रतिस्पर्धी खेळाडूंना उकसवणे हा ऑस्ट्रेलियाचा गेमप्लॅन असतो. हे लक्षात घेता सँडपेपर बॉलवर घासणे हा सुनियोजित कट होता अशी ऑस्ट्रेलियाच्या संघावर टीका झाली. कोच डॅरेन लेहमन या कटाचे सूत्रधार आहेत असंही बोललं गेलं. या मालिकेनंतर लेहमन यांनी कोचपदाचा राजीनामा दिला.

मायदेशी परतल्यानंतर वॉर्नर आणि स्मिथ यांनी पत्रकार परिषद घेऊन चाहत्यांची माफी मागितली. आमच्या कृत्यामुळे क्रिकेट खेळाला काळिमा लागला. ऑस्ट्रेलियाच्या प्रतिमेला धक्का बसला. आमच्या हातून घोडचूक झाली. केलेल्या कृत्याचा आम्हाला पश्चाताप होत आहे, पुन्हा आमच्या हातून असं काही घडणार नाही असं वॉर्नर आणि स्मिथने सांगितलं. गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यासाठी प्रसिद्ध अशा या जोडगोळीला पत्रकार परिषदेत ढसाढसा रडताना सगळ्यांनी पाहिलं. वर्षभराच्या बंदीनंतर या दोघांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिमाखात पुनरागमन केलं. मात्र या प्रकरणात व्हिलन ठरलेल्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्टचं पुनरागमन विरुन गेलं. बॅनक्रॉफ्टची कारकीर्द या प्रकरणामुळे संपुष्टात आली.

आठ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्या प्रकरणातील आरोपी आणि दोषी स्टीव्हन स्मिथ आताही ऑस्ट्रेलियाच्या संघाचा भाग आहे. बॅनक्रॉफ्ट डोमेस्टिक क्रिकेट खेळतो तर वॉर्नर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लॉयन ही चौकडी ऑस्ट्रेलियाच्या आक्रमणाची धुरा सांभाळत आहे.

आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर

आठ वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. धावांसाठी झगडणाऱ्या मार्नस लबूशेनला संघात स्थान देण्यात आलं आहे. सँडपेपर गेट प्रकरणाचा भाग असलेले स्टीव्हन स्मिथ, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि नॅथन लॉयन ही चौकडी संघात आहे. मॅट रेनशॉ सलामीवीराच्या भूमिकेत असेल. कूपर कॉनली, मायकेल नेसर आणि मॅथ्यू कुन्हेमन यांचा समावेश करण्यात आला आहे. जोश इंगलिस आणि स्कॉट बोलँड हे अनुक्रमे राखीव फलंदाज आणि राखीव गोलंदाज असतील.