क्रिकेटमुळे भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील का? मोदींच्या मंत्रीमंडळातील परराष्ट्र मंत्री म्हणाले, "आपण जोपर्यंत..." | Will cricket ties change between India Pakistan foreign minister Jaishankar reacts scsg 91 | Loksatta

क्रिकेटमुळे भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील का? मोदींच्या मंत्रीमंडळातील परराष्ट्र मंत्री म्हणाले, “आपण जोपर्यंत…”

भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांसंदर्भात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचं मोठं विधान

क्रिकेटमुळे भारत-पाकिस्तान संबंध सुधारतील का? मोदींच्या मंत्रीमंडळातील परराष्ट्र मंत्री म्हणाले, “आपण जोपर्यंत…”
मुलाखतीमध्ये प्रश्नाला उत्तर देताना केलं विधान (फोटो- एपी आणि पीटीआयवरुन साभार)

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान संबंधसंदर्भात ‘अजेंडा आज तक’च्या कार्यक्रमामध्ये भाष्य केलं आहे. भारत आणि पाकिस्तान संबंधांबद्दल परराष्ट्रमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी, “तुमच्या शेजाऱ्याने तुमच्या डोक्याला बंदुक लावली तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा कराल का?” असा प्रतिप्रश्न पत्रकाराला केला. तसेच जयशंकर यांनी भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांमधून दोन्ही देशांचे संबंध सुधारतील का यासंदर्भातही भाष्य केलं.

“जर तुमचे शेजारी खुलेपणे दहशतवाला पाठिंबा देत असतील तर तुम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी जाल का? दहशतवादी तळांवर ते कशापद्धतीने कारवाई करतात याकडे लक्ष्य ठेवण्याचं आपलं काम आहे. भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पण ते दहशतवादाचा मार्ग सोडतील अशी आमची अपेक्षा आहे,” असंही एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे.

दोन्ही देश हे कायमच विरोधी टोकांना असतात. अशावेळेस क्रिकेटच्या माध्यमातून काही घडू शकतं का? हा खेळ दोन्ही देशांमध्ये उत्साहाने पाहिला जातो, असं म्हणत एस. जयशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, “क्रिकेटसंदर्भातील आपली भूमिका तुम्हाला ठाऊक आहे. एखादा देश दहशतवादाला पाठिंबा देतोय आहे हे आपण कधीच स्वीकारता कामा नये. आपण जोपर्यंत याचा विरोध करत नाही तोपर्यंत हे असंच सुरु राहील. त्यामुळेच पाकिस्तानवर जागतिक स्तरावरील दबाव निर्माण करणं गरजेचं आहे. दहशतवाला बळी पडलेले (देश) जोपर्यंत समोर येऊन यासंदर्भात उघड भूमिका घेत नाहीत तोपर्यंत हा दबाव निर्माण होणार नाही. यामध्ये भारताने पुढाकार घ्यायला हवा कारण यासाठी आपण रक्त सांडलं आहे,” असं एस. जयशंकर यांनी सांगितलं.

परराष्ट्र मंत्र्यांनी गलवानमधील संघर्ष तसेच युक्रेन-रशिया युद्धादरम्यान रशियाकडून कच्चे तेल विकत घेण्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 08:49 IST
Next Story
Fifa World Cup 2022: मेस्सीने रचला इतिहास; पेनल्टी शूटआऊटमध्ये नेदरलँडचा पराभव करत अर्जेंटिना उपांत्य फेरीत