महिला बॉक्सिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलेल्या भारताच्या मेरी कोमला ऑलिम्पिकचे सुवर्णपदक खुणावत आहे. रिओ ऑलिम्पिक कदाचित तिच्यासाठी अखेरची संधी असेल असे म्हटले जात असून या स्पर्धेसाठी तंदुरुस्ती व शारीरिक क्षमता वाढविण्यावर भर देणार असल्याचे मेरीने सांगितले.
रिओ ऑलिम्पिकच्या तयारीविषयी मेरी हिने सांगितले की, ‘‘ऑलिम्पिक पात्रता पूर्ण करण्याबाबत मला कोणतीही अडचण येणार नाही. ऑलिम्पिकसाठी एक वर्ष बाकी असले तरी मी यापूर्वीच या स्पर्धेसाठी सराव सुरू केला आहे. ऑलिम्पिकपूर्वी स्पर्धात्मक सरावाची मला संधी मिळणार आहे. त्याचा फायदा मला निश्चितपणे होईल. संभाव्य प्रतिस्पर्धी कोण असतील, त्यांचे तंत्र कसे आहे याचा अभ्यास मला करता येणार आहे. सराव शिबिरात प्रामुख्याने तंदुरुस्ती व शारीरिक क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे.
मेरी कोम ही येथे अल्पकालीन सरावासाठी आली आहे. लंडन येथे २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवीत मेरी हिने बॉक्सिंगमध्ये ऑलिम्पिक पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला होण्याची कामगिरी केली. या स्पर्धेपूर्वी बरेच महिने ती येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत सराव करीत होती. २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवीत स्पर्धात्मक बॉक्सिंगमधून निवृत्त होण्याचा तिचा मनोदय आहे.
बालेवाडीतील क्रीडा संकुलातच ती सध्या सराव करीत आहे. तिला फिजिओ, ट्रेनर, आदी विविध सुविधांसाठी ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्ट संस्थेचे सहकार्य लाभले आहे. येथील सरावाबाबत मेरी म्हणाली, ‘‘ऑलिम्पिक पदक मिळावे यासाठी मला एकाग्रतेने व घरापासून दूर राहूनच सराव करायचा होता. पुण्यातील क्रीडानगरीविषयी मी खूप ऐकले होते. त्यामुळेच लंडन ऑलिम्पिकच्या तयारीसाठी मी पुण्याची निवड केली. येथील आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग, धावण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा ट्रॅक, अद्ययावत जलतरण तलाव, अव्वल दर्जाची व्यायामशाळा आदी सुविधांचा मला खूप फायदा झाला. मी माझ्या घरापासून हजारो मैल दूर होते, मात्र येथील पोषक वातावरणामुळे माझ्या मनाचा कधीही कोंडमारा झाला नाही. अतिशय एकाग्रतेने व आत्मविश्वासाने मी सराव करू शकले. त्यामुळेच पुण्याची क्रीडानगरी सतत माझ्या स्मरणात राहील.’’
पुण्यात बॉक्सिंग अकादमी स्थापन करण्यास आवडेल काय, असे विचारले असता मेरी म्हणाली, ‘‘सध्या मणिपूरमध्ये मी अकादमी सुरू केली आहे. त्यास भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. पूर्वाचलात बॉक्सिंगकरिता विपुल नैपुण्य आहे. साहजिकच मी त्यांच्यावर लक्ष केंद्रित करीत आहे. मात्र जर पुण्यात संधी मिळाली तर माझ्या अकादमीची उपशाखा स्थापन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.’’