Ryan Rickelton On Hardik Pandya Injury: आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाला नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ५ वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा संघ यावेळी विजय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या मुंबई इंडियन्सने आतापर्यंत १० पैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत. तर ७ सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनौविरूद्ध झालेल्या सामन्यात मुंबईने दमदार विजय मिळवला. पण इथून पुढे प्रत्येक सामना हा मुंबई इंडियन्ससाठी ‘करो वा मरो’ सामना असणार आहे. लखनौविरूद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. आता त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
गुणतालिकेत तळाशी असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी इथून पुढे सर्व सामने नॉकआऊट सामने असणार आहे. एकही सामना गमावला, तर मुंबईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडू शकतो. त्यामुळे मुंबईला आणखी जोर लावावा लागणार आहे. लखनौविरूद्ध झालेला सामना देखील मुंबई इंडियन्ससाठी अतिशय महत्वाचा होता. या महत्वाच्या सामन्यात मुंबईने दमदार कामगिरी केली आणि ६ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात हार्दिक पंड्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता.
हार्दिक पंड्या पाठीच्या दुखण्यामुळे या सामन्यात खेळू शकला नव्हता. मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर, रायन रिकल्टनने पत्रकार परिषदेत बोलताना हार्दिकच्या फिटनेसबाबत अपडेट दिली आहे. रिकल्टन म्हणाला, “तो कधी परतणार मला माहीत नाही. मला काही तासांआधीच समजलं की, त्याच्या पाठीला दुखापत झाली आहे. ही समस्या नेमकी किती गंभीर आहे, याची मला कल्पना नाही.”
हार्दिक पुढील सामन्यात खेळणार का?
हार्दिक पंड्या यापुढे होणाऱ्या सामन्यात खेळणार का? याबाबत बोलताना हार्दिक पंड्या म्हणाला, “मी या दुखापतीबाबत फार काही बोलू शकत नाही. कारण त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे मला माहीत नाही. मला वाटतं, तो या आठवड्यात पुन्हा एकदा संघासोबत जोडला जाऊ शकतो. आम्ही आता रायपूरला जाणार आहे.”
