भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात टी-२० मालिकेत युवा नवदीप सैनीला भारतीय संघात स्थान देण्यात आलं. नवदीपनेही मिळालेल्या संधीचं सोन करुन दाखवत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. त्याच्या याच कामगिरीमुळे विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेत नवदीपला राखीव गोलंदाज म्हणून भारतीय संघासोबत ठेवण्यात आलं. कसोटी मालिकेतही भारताने विंडीजला २-० ने व्हाईटवॉश दिला. या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा या त्रिकुटाने केलेली कामगिरी पाहता, भविष्यकाळात कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी आपल्याला अधिक मेहनतीची गरज लागणार असल्याचं नवदीप सैनीने म्हटलंय.

अवश्य वाचा – Ind vs SA : कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, लोकेश राहुलला डच्चू

“कसोटी संघात भारताची गोलंदाजी ही भक्कम आहे. ज्यावेळी मी भारतीय संघासोबत वेस्ट इंडिजमध्ये होतो, त्यावेळा एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे कसोटी संघात मला स्थान मिळवायचं असेल तर मला अधिक मेहनीतीची गरज आहे. मेहनत करत राहिलो तरच मला कसोटी संघात स्थान मिळेल.” Public Sector T20 स्पर्धेआधी नवदीप पत्रकारांशी बोलत होता.

इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांनी कसोटी संघात आपलं स्थान पक्क केलं आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव हे गोलंदाज परिस्थितीनुरुप संघात असतात. गेल्या काही महिन्यांमध्ये या गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर भारत कसोटी क्रमवारीत आपलं पहिलं स्थान कायम राखून आहे. या सर्व गोलंदाजांशी बातचीत केल्यानंतर, कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याबद्दल मार्गदर्शन केलं. सध्याच्या घडीला कसोटी संघात स्थान मिळवणं कठीण असलं तरीही मी मेहनत करत राहिन असं सैनीने स्पष्ट केलं. ३ ऑक्टोबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.