इंधन वाचवा या पंतप्रधानांनी देशवासीयांना केलेल्या आवाहनाला अनुसरून आयपीएल प्रशासनाने आगामी सामने एकाच शहरात प्रेक्षकांविना घ्यावेत अशी मागणी द चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने केली आहे. यासंदर्भात रीतसर पत्रच केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना पाठवलं आहे.
३१ मार्च पासून आयपीएलचा १९वा हंगाम सुरू झाला. मे महिन्याच्या मध्यावर आहोत. आतापर्यंत १० संघ, तंत्रज्ञ, पदाधिकारी, टेलिव्हिजन क्रू यांनी मिळून हजारो किलोमीटर प्रवास केला असेल. यामध्ये हवाई तसंच रस्ते वाहतुकीचा समावेश असेल. यंदाच्या हंगामात ७४ सामने होणार आहेत. प्रत्येक संघ होम आणि अवे पद्धतीने खेळतो. १० ते १२ ठिकाणी सामने आयोजित करण्यात आले आहेत. प्रत्येक संघ स्टेडियम-विमानतळ-हॉटेल ही त्रिसुत्री अनुसरतो. दररोज किमान १०० ते १५० जण प्रवास करतात. स्पर्धेचं स्वरुप लक्षात घेता होम-अवे पद्धतीने सामने आयोजित होणं स्वाभाविक आहे पण सद्य परिस्थितीत एवढ्या मोठ्या प्रमाणावर हवाई वाहतुकीद्वारे संघ तसंच बाकी माणसांची ये जा होणं यामुळे यंत्रणांवर मोठा भार पडू शकतो असं चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीचे चेअरमन ब्रिजेश गोएल यांनी १७ मे रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, बाकी मंत्री, सरकारी अधिकारी यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यायला सुरुवात केली. पंतप्रधानांनी स्वत:च्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी केली आहे. असंख्य नागरिक इंधन वाचवण्यासाठी आपापल्या परीने कृती करत आहेत. आयपीएल ही एकमेव स्पर्धा किंवा कार्यक्रम आहे जो या प्रश्नापासून अलिप्त राहिला आहे.
आयपीएलचे आणखी बरेच सामने बाकी आहेत. उर्वरित सामने एकाच शहरात आयोजित करता येऊ शकतात. जेणेकरून संघ-तंत्रज्ञ, टेलिव्हिजन क्रू यांचा प्रवास कमी होईल. इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होईल. कोरोना काळात मुंबई-पुणे या दोन शहरातच संपूर्ण स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यात आली होती असं गोएल यांनी म्हटलं आहे. हवाई वाहतूक कमी होणं आवश्यक आहे. उर्वरित सामने प्रेक्षकांविना आयोजित व्हावेत असंही या पत्रात म्हटलं आहे. प्रत्येक स्टेडियमची क्षमता वेगवेगळी असते. सरासरी प्रेक्षक क्षमता २५००० ते ५०००० असू शकते. काही स्टेडियमचा आकार प्रचंड असून तिथे एक लाखापेक्षा चाहते सामन्याचा आनंद लुटतात. प्रेक्षकांविना सामने भरवल्यास हजारो लिटर पेट्रोल-डिझेल वाचवता येईल.
चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएल संघ जाण्यायेण्यासाठी चार्टर्ड म्हणजेच खाजगी विमानाचा वापर करतात. बोइंग ७३७, एअरबस ए३२० ही विमानं वापरली जातात. ही विमानं तासाला २४०० ते ३००० लिटर हवाई इंधन अर्थात एव्हिएशन टर्बाइन फ्युइल खातात. संघाचं विमान दोन तास प्रवास करतं असं गृहित धरलं तरी प्रत्येक प्रवासासाठी ५००० ते ६००० एटीएफ खर्च होतं. विमान मोठं असेल किंवा अंतर जास्त असल्यामुळे प्रवासाचा वेळ वाढला तर एटीएफ ७००० ते ८००० एवढं लागू शकतं. हे फक्त एका संघाचं उदाहरण आहे. आयपीएलमध्ये १० संघ आहेत. याव्यतिरिक्त स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक असं मोठं मनुष्यबळ सातत्याने प्रवास करतं. प्रत्येक संघ १० वेळा विमान प्रवास करतो असं गृहित धरलं तरी संघामागे ५०,००० ते ७०,००० एटीएफ खर्च होत आहे.
हे इंधन वाचवणं सद्यस्थितीत आवश्यक आहे. म्हणूनच उर्वरित सामने एक किंवा दोन शहरात प्रेक्षकांविना आयोजित करण्यात यावेत. यामुळे हजारो रुपयांच्या इंधनाची बचत होऊ शकते असं गोएल यांनी म्हटलं आहे. १८ मे रोजी आयपीएलचं वेळापत्रक पाहिलं तर यंदाच्या हंगामातले ११ सामने शिल्लक आहेत. जयपूर, कोलकाता, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ, मुंबई, धरमशाला, मुल्लापूर अशा विविध ठिकाणी होणार आहेत.
२०१६ मध्ये महाराष्ट्रात भीषण असा दुष्काळ पडला. त्यावेळी राज्यात होणारे आयपीएलचे सामने न्यायालयाच्या आदेशानुसार अन्यत्र हलवण्यात आले होते. दुष्काळ ही गंभीर समस्या आहे. अशावेळी क्रिकेट सामन्यांसाठी ६०,००० लिटर पाणी वापरणं योग्य नाही असं न्यायालयाने म्हटलं होतं.
पंतप्रधानांनी काय आवाहन केलं होतं?
“पेट्रोल आणि डिझेलचा शक्य तेवढा कमी वापर करा, वर्षभर सोन्याची खरेदी करु नका आणि घरुनच काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) प्राधान्य द्या”, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलं होतं. “देशाचे सर्वात जास्त परकीय चलन कच्च्या तेलाच्या खरेदीवर खर्च होते. त्यामुळे शक्य तेवढा पेट्रोल -डिझेलचा वापर कमी करा. मेट्रोचा वापर करा. कार असणाऱ्या लोकांनी इतरांना लिफ्ट द्या”. खाद्यतेलाच्या वापराबाबतही काटकसर करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. यामुळे देश आणि आरोग्याला देखील फायदा होईल, असे मोदी म्हणाले होते.
