Ruturaj Gaikwad On MS Dhoni: आयपीएल २०२६ स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. स्पर्धेतील ६६ वा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा दोन्ही संघांचा या हंगामातील साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. गुजरातचा संघ आधीच प्लेऑफसाठी पात्र ठरला होता. तर चेन्नईकडे हा सामना मोठ्या फरकाने जिंकून प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्याची संधी होती. पण चेन्नईला हा सामना गमवावा लागला आहे. २३० धावांचा पाठलाग करताना चेन्नईचा डाव अवघ्या ८९ धावांवर आटोपला. यासह चेन्नईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. दरम्यान एक प्रश्न कायम राहिला, तो म्हणजे एमएस धोनी निवृत्ती घेणार की पुढच्या हंगामात खेळणार? याबाबत ऋतुराज गायकवाडने मोठा खुलासा केला आहे.

एमएस धोनीने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून दरवर्षी आयपीएल स्पर्धेत एकच चर्चा रंगते, ती म्हणजे हे धोनीचं शेवटचं हंगाम असणार का? या हंगामात चेन्नईचा चेपॉकच्या मैदानावरील शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरूद्ध पार पडला. या सामन्यात धोनी खेळणार आणि निवृत्तीची घोषणा करणार, असं म्हटलं जात होतं. पण असं काहीच झालं नाही. धोनीने निवृत्तीची घोषणा केलेली नाही. या हंगामातील पहिल्या सामन्याआधीच धोनी दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे १४ पैकी एकही सामना खेळू शकलेला नाही.

चेन्नईच्या शेवटच्या सामन्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने धोनी पुढील हंगामात खेळताना दिसणार की नाही याबाबत अपडेट दिली आहे. ऋतुराज म्हणाला, “याचं उत्तर तुम्हाला पुढच्या वर्षी मिळेल. त्याची उणीव भासणं हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का आहे. तो शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला येऊन केवळ क्रीझवर उभा राहूनच सामन्याचं चित्र पालटू शकतो. पुढच्या हंगामाबद्दल सध्या काहीच सांगू शकत नाही. पण सध्या आमच्याकडे जे खेळाडू आहेत, त्यांच्या कामगिरीवर मी अत्यंत आनंदी आहे.”

चेन्नईचा सर्वात मोठा पराभव

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाकडून शुबमन गिलने ६४, साई सुदर्शनने ८४ आणि जोस बटलरने नाबाद ५७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर गुजरातने २० षटकांअखेर ४ गडी बाद २२९ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या चेन्नईकडून शिवम दुबेने सर्वाधिक ४७ धावांची खेळी केली. पण इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. चेन्नईचा डाव १४० धावांवर आटोपला. यासह गुजरातने हा सामना ८९ धावांनी आपल्या नावावर केला.