Will Pucovski Lawsuit Brighton Grammar Concussion: ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू विल प्युकोव्हस्कीची आश्वासक क्रिकेट कारकीर्द वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी संपुष्टात आली. विलने अनेक वेळा मेंदूला झालेल्या दुखापतींमुळे निवृत्ती जाहीर केली. आता प्युकोव्हस्कीने किशोरवयात झालेल्या पहिल्या गंभीर डोक्याच्या दुखापतीप्रकरणी आपल्या शाळेविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.
कोड क्रिकेटच्या वृत्तानुसार, प्युकोव्हस्कीच्या वकिलांनी ब्राइटन ग्रामर या मेलबर्नमधील खासगी शाळेविरोधात न्यायालयात दावा दाखल केला आहे. २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन रुल्स फुटबॉलच्या सरावादरम्यान प्युकोव्हस्कीला मेंदूला दुखापत झाली होती. या घटनेनंतर त्याची योग्य काळजी घेण्याच्या कर्तव्यात शाळा अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यावेळी प्युकोव्हस्की अवघ्या १६ वर्षांचा होता.
या घटनेनंतर प्युकोव्हस्कीच्या कारकिर्दीत अशा दुखापतींची मालिका सुरू झाली. क्रिकेट खेळताना त्याला एकूण १३ वेळा मेंदूला दुखापत झाल्याची नोंद आहे. अखेर २०२४ मध्ये वैद्यकीय समितीने त्याला क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची शिफारस केली. ऑस्ट्रेलियाच्या व्यावसायिक क्रिकेटमधील सुरुवातीच्या काळात विल प्युकोव्हस्कीला देशातील सर्वात प्रतिभावान फलंदाजांपैकी एक मानलं जात होतं.
ब्राइटन ग्रामरमध्ये प्युकोव्हस्कीला झालेल्या पहिल्या कनक्शननंतर नेमकं काय घडलं, हा कायदेशीर प्रकरणाचा मूळ मुद्दा आहे. ऑस्ट्रेलियन रुल्स फुटबॉलच्या सरावादरम्यान प्युकोव्हस्कीला जोरदार धक्का बसून तो बेशुद्ध झाला होता. मात्र, देण्यात आलेल्या दाव्यातील माहितीनुसार, धक्का बसल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच तो पुन्हा सरावासाठी मैदानात उतरला. या दुखापतीच्या परिणामांमुळे त्याला अनेक महिने शाळेतून दूर राहावं लागलं होतं.
यावर्षीच्या सुरुवातीला लॉर्ड्स टॅव्हर्नर्सच्या एका कार्यक्रमात बोलताना प्युकोव्हस्कीने त्या घटनेचा सविस्तर उल्लेख केला. त्या दिवसानंतर आपल्याला पूर्वीसारखं कधीच वाटलं नाही, असं त्याने सांगितलं. प्युकोव्हस्की म्हणाला, “मला अक्षरशः मैदानाच्या बाजूला नेण्यात आलं. त्यानंतरची माझी एकमेव आठवण म्हणजे प्रशिक्षक माझ्याकडे आल् आणि म्हणाल्, ‘तुला सराव सुरू ठेवायचा आहे का?’ मी ‘हो’ म्हणालो. त्यानंतर मी दिवसभर पुन्हा सराव केला.”
तो पुढे म्हणाला, “एका विचित्र अर्थाने तो माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता, कारण त्या दिवसापासून मला पुन्हा कधीच पूर्वीसारखं वाटलं नाही. त्याआधी मी कोणतीही गोष्ट करण्यासाठी नेहमी तयार असायचो; पण त्यानंतर बराच काळ मी काहीही न करता फक्त सोफ्यावर बसून राहायचो.” या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी प्युकोव्हस्की अस्पष्ट दिसू लागलं, तर दुखापतीनंतर आठवड्याभराने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
प्युकोव्हस्कीची ही कायदेशीर लढाई अशा कारकीर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली आहे, जेव्हा त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, डोक्याला झालेल्या दुखापतींमुळे त्याच्या कारकिर्दीवर परिणाम होत होता.
प्युकोव्हस्कीला नेमक्या कोणत्या समस्येचा सामना करावा लागतो?
मागील वर्षी निवृत्ती जाहीर करताना प्युकोव्हस्कीने वारंवार झालेल्या कनक्शनमुळे त्याच्या दैनंदिन आयुष्यावर झालेल्या गंभीर परिणामांबाबत मोकळेपणाने भाष्य केलं होतं. त्याने सांगितलं होतं की, त्याला थकवा, डोकेदुखी, प्रवासात किंवा मळमळणे आणि डाव्या बाजूला घडणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात अडचणींचा सामना करावा लागत होता. तो त्यावेळी म्हणाला होता, “घरात फिरणंसुद्धा माझ्यासाठी अवघड होतं.” या लक्षणांचा त्याच्या नातेसंबंधांवर आणि दैनंदिन जीवनातील साधी कामं करण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला होता.
प्युकोव्हस्की म्हणाला, “माझी होणारी पत्नी नाराज होती, कारण मी घरातील कामांमध्ये हातभार लावत नव्हतो. मी खूप वेळ झोपत होतो. त्यानंतरचं वर्ष खूप कठीण होतं. अनेक लक्षणं दूर झाली नाहीत आणि त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला.” तो पुढे म्हणाला, “वैद्यकीय समितीने मला निवृत्ती घेण्याची शिफारस केली आणि हे स्वीकारणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. मला शक्य तितका वेळ माझं हे स्वप्न जिवंत ठेवायचं होतं. पण दुसरीकडे, तुम्हाला स्वतःला बरं वाटावं आणि सामान्य आयुष्य जगता यावं, हेही तितकंच महत्त्वाचं आहे.” तो म्हणाला, “माझ्या मेंदूला आतापर्यंत झालेल्या नुकसानापेक्षा आणखी नुकसान होण्याचा धोका मला पत्करायचा नाही.”
वयाच्या अवघ्या २७व्या वर्षी प्युकोव्हस्कीने अजून किमान एक दशक किंवा त्याहून अधिक काळ सर्वोच्च स्तरावर क्रिकेट खेळण्याची अपेक्षा होती. मात्र, ज्या खेळासाठी त्याने संपूर्ण आयुष्य झोकून दिलं, त्याच खेळापासून त्याला अखेर दूर व्हावं लागलं. आता, प्युकोव्हस्कीच्या म्हणण्यानुसार त्याचं आयुष्य बदलून टाकणाऱ्या पहिल्या कनक्शनला दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतर, ऑस्ट्रेलियाच्या या माजी फलंदाजाने ज्या शाळेत ही दुखापत झाली होती, त्याच शाळेविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.
