Rinku Singh: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये भारतीय संघाने चॅम्पियनसारखा खेळ केला. पण सुपर ८ फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर, भारतीय संघाचं सुपर ८ फेरीत जाण्याचं गणित बिघडलं आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरूद्धचा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दरम्यान या सामन्यात रिंकू सिंग खेळणार का? याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील पुढील सामना २६ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरूद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिंदबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. मंगळवारी भारतीय खेळाडू सराव करण्यासाठी मैदानात उतरले होते. पण नेमकी त्याचवेळी रिंकू सिंग वैयक्तिक कारणास्तव घरी परतल्याची माहिती समोर आली होती. रिंकूच्या वडिलांना स्टेज ४ कॅन्सर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात तो परतणार की नाही? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. दरम्यान सामन्याच्या एक दिवसाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना, सितांशू कोटक यांनी दिली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सितांशू कोटक म्हणाले, “रिंकू चेन्नईमध्ये परतणार असून लवकरच भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे. त्याच्या वडिलांची तब्येत ठिक नसल्याने तो आपल्या घरी परतला होता.” यावरून हे तर स्पष्ट झालं आहे की, रिंकू सिंग या महत्वाच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. पण त्याचा प्लेईंग ११ मध्ये समावेश केला जाणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. रिंकूला या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. त्याने क्षेत्ररक्षणात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पण तो फलंदाजीत आपली छाप सोडू शकलेला नाही.
झिम्बाब्वेविरूद्ध महत्वाचा सामना
झिम्बाब्वेविरूद्ध होणारा सामना हा भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. भारतीय संघाचा सुपर ८ फेरीतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरूद्ध पार पडला. भारतीय संघाला हा सामना जिंकणं महत्वाचं होतं. पण भारताने हा सामना ७६ धावांनी गमावला. त्यामुळे भारतीय संघाला जर सुपर ८ च्या शर्यतीत टिकून राहायचं असेल, तर झिम्बाब्वेविरूद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे. त्यानंतर सुपर ८ फेरीतील शेवटच्या सामन्यातही न्यूझीलंडला पराभूत करावं लागणार आहे.

