MS Dhoni On Virat Kohli And Rohit Sharma: भारताचे अनुभवी फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दोघेही केवळ वनडे क्रिकेट संघाचा भाग आहेत. एकच फॉरमॅट खेळून सुद्धा दोघांच्या फलंदाजीतील धार काही कमी झालेली नाही. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही बलाढ्य संघांविरूद्ध झालेल्या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही अनुभवी फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला होता. दोघेही वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार, असं म्हटलं जात आहे. दरम्यान विराट आणि रोहित ही जोडी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धा खेळणार का? याबाबत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर एमएस धोनीने दिलेलं उत्तर सध्या तुफान चर्चेत आहे.

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने नुकताच एका खाजगी कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील चर्चेदरम्यान त्याला, विराट कोहली आणि रोहित शर्मा ही जोडी वर्ल्डकप २०२७ स्पर्धा खेळणार का? याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर आपली प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला, “त्यांनी पुढचा वर्ल्ड कप का खेळू नये? माझ्यासाठी वय हा कोणताही निकष नाही. कामगिरी आणि फिटनेस सर्वात महत्त्वाचे आहे. मला वाटतं की कोणालाही काही सांगण्याची गरज नाही, पण गोष्टी स्पष्ट असायला हव्या. प्रत्येकासा समान वागणूक दिली गेली पाहिजे.”

तसेच एमएस धोनीने खेळाडूंना आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. तो म्हणाला, “जर ते चांगली कामगिरी करत असतील आणि त्यांच्या मनात देशासाठी सातत्याने चांगलं करण्याची जिद्द असेल, तर का नाही? तुम्हाला अनुभवी खेळाडू कसे मिळणार? जोपर्यंत तो सचिन तेंडुलकर नाही, तोपर्यंत तुम्ही २० वर्षांच्या खेळाडू कडून अपेक्षा करू शकत नाही. प्रत्येकाला समान लेखलं पाहिजे. जर ते चांगली कामगिरी करत असतील, तर ते नक्कीच संघात असतील.”

विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी आपल्या दमदार कामगिरीच्या बळावर संघातील स्थान कायम ठेवलं आहे. विराटने ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात नाबाद ७४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या मालिकेत त्याने लागोपाठ २ शतकं आणि १ अर्धशतक झळकावलं होतं. त्यानंतर विजय हजारे ट्रॉफीतही त्याने शतक झळकावलं होतं. तर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळताना २०२ धावा केल्या होत्या.