Royal Challengers Bengaluru Name Change: आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू होण्याआधी मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. राजस्थान रॉयल्स संघानंतर आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा मालक देखील बदलला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मालकी हक्क तब्ब १६,७०६ कोटींमध्ये विकले गेले आहेत. याआधी या संघाचे मालकी हक्क सुरूवातीला विजय मल्याच्या युनायटेड ब्रुव्हरीजकडे आणि त्यानंतर युनायटेड स्पिरिट्सकडे होते. आता १६,७०६ कोटींची बोली लागल्यानंतर या संघावर हक्क आदित्य बिर्ला समूह, टाईम्स ऑफ इंडिया समूह, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन बीएक्सपीई कंपन्यांची संयुक्त मालकी असेल. दरम्यान संघमालक बदलल्यानंतर संघाचं नाव बदललं जाणार का? अशी चर्चा आता रंगायला सुरूवात झाली आहे.
आदित्य बिर्ला समूह, टाईम्स ऑफ इंडिया समूह, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोन बीएक्सपीई या समूहांनी मिळून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे मालकी हक्क विकत घेतले आहेत. आर्यमन बिर्ला हे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू फ्रँचायझीचे नवे चेअरमन असणार आहेत. फ्रँचायझीला नवा मालक मिळाल्यानंतर, आता संघाचं नाव बदललं जाणार का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगायला सुरूवात झाली आहे. अखेर आर्यमन बिर्ला यांच्या बहीण अनन्या बिर्ला यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ हा २००८ पासून या स्पर्धेचा भाग आहे. या संघाचे संघमालक बदलले पण नाव अजूनही तेच आहे. स्पर्धेतील पहिल्या हंगामापासून विराट कोहली या संघाचा भाग आहे. आतापर्यंत हा संघ अंतिम फेरीत दाखल झाला होता. पण एकदाही या संघाला जेतेपदाची ट्रॉफी उंचावता आली नव्हती. संघातील अनुभवी खेळाडू विराट कोहलीने संघाला चॅम्पियन बनवण्यासाठी पूर्ण जोर लावला. पण तो संघाला चॅम्पियन बनवू शकला नव्हता. अखेर आयपीएल २०२५ स्पर्धेत रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. या ट्रॉफीसाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १८ वर्ष वाट पाहावी लागली. आर्यमन बिर्ला यांच्या बहीण अनन्या बिर्ला यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी रिपोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी स्पष्ट केलं आहे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं नाव बदललं जाणार नाही.
यासह त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट देखील शेअर केली होती. या पोस्टद्वारे त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या चाहत्यांचे आभार मानले होते. यासह आरसीबीचा संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरणार, असं देखी लिहिलं होतं.
