India vs Afghanistan, Vaibhav Sooryavanshi: भारतीय क्रिकेट संघ आशियाई क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. भारतीय संघ थेट क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय संघाचा क्वार्टर फायनलचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंकेला पराभूत करून सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्यामुळे भारतीय पुरुष क्रिकेट संघासमोरही सुवर्णपदक जिंकण्याचं आव्हान असणार आहे. अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ नागोयामध्ये दाखल झाला आहे. दरम्यान या सामन्यात तरी वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का? जाणून घ्या.
भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आव्हानाची सुरूवात थेट क्वार्टरफायनलच्या सामन्याने करणार आहे. भारतीय संघाचा क्वार्टर फायनलचा सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. काही दिवसांपूर्वी भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली होती. या मालिकेत भारतीय संघाने अफगाणिस्तानवर ३-० ने विजय मिळवला होता. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यातही विजयासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. या मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान दिलं गेलं होतं. पण ३ पैकी एकही सामन्यात त्याला खेळण्याची संधी दिली गेली नव्हती.
वैभव सूर्यवंशीला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळणार का?
क्वार्टर फायनलच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला संधी मिळणार का? अशी चर्चा रंगली आहे. पण या सामन्यातही वैभव सूर्यवंशीला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली होती. जर भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकायचं असेल, तर ३ पैकी ३ सामने जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे भारतीय संघ इतक्यात तरी जोखीम घेणार नाही. संजू आणि अभिषेक शर्माचा फॉर्म पाहता वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा बाकावरच राहण्याची शक्यता आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, शिवम दुबे, वैभव सूर्यवंशी , विपराज निगम आणि यश ठाकुर
