Virat Kohli injury update: आयपीएल २०२६ स्पर्धेत आज होणाऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना लखनौतील अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, विराट कोहली या सामन्यातही खेळणार का? कारण मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो लखनौ सुपर जायंट्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार का? याबाबत अपडेट समोर आली आहे.
विराट कोहलीबाबत बोलायचं झालं, तर क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विराट कोहली लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो. मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला मैदान सोडून जावं लागलं होतं. पण काळजी करण्यासारखं काहीच नाही. या सामन्यात तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरण्याची शक्यता खूप कमी आहे. त्यामुळे तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून केवळ फलंदाजीसाठी मैदानात येऊ शकतो. लखनौविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी त्याने नेट्समध्ये जोरदार सराव केला. पण त्याच्या पायावर पट्टी होती.
गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने ४ पैकी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर राजथान रॉयल्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचण्याची संधी असणार आहे. तर ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा लखनौचा संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. हा सामना जिंकून लखनौकडे टॉप ४ मध्ये प्रवेश करण्याची संधी असणार आहे.
लखनौ सुपर जायंट्स संघाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. घरच्या मैदानावर खेळताना या संघाला एकही विजय मिळवता आलेला नाही. लखनौला आतापर्यंत झालेल्या ४ पैकी २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. या ४ पैकी २ सामने ते घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरले होते. या दोन्ही सामन्यांमध्ये लखनौला पराभव पत्करावा लागला आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पराभूत करून लखनौचा संघ घरच्या मैदानावर पहिला विजय मिळवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
