साखळी फेरीत भारताच्या ‘अ’ गटात दक्षिण कोरिया आणि बांगलादेशचे आव्हान असेल. परंतु ‘ब’ गटात इराण आणि थायलंड यांच्यातील लढतीकडे तसेच त्यांच्या कामगिरीकडे आमचे लक्ष असेल. आमची अंतिम फेरीत थायलंडशी गाठ पडण्याची शक्यता अधिक आहे. परंतु सुवर्णपदक आम्हीच जिंकू, असा विश्वास भारतीय महिला कबड्डी संघाच्या प्रशिक्षिका नीता दडवे यांनी व्यक्त केला. आशियाई क्रीडा स्पध्रेत भारताची २८ सप्टेंबरला बांगलादेशशी आणि ३० सप्टेंबरला दक्षिण कोरियाशी लढत होईल.
सध्या भारताच्या पुरुष आणि महिला संघाचे भोपाळमध्ये विशेष सराव शिबीर चालू आहे. याबाबत १९९६-९७मध्ये अर्जुन पुरस्काराला गवसणी घालणाऱ्या नागपूरच्या दडवे म्हणाल्या, ‘‘प्रो-कबड्डी लीगमुळे खेळातील वातावरणात अतिशय बदल झाला आहे. कबड्डीपटूंना पाहण्यासाठी भोपाळमध्येसुद्धा उत्सुकता दिसून येते. लवकरच महिलांचीसुद्धा प्रो-कबड्डी सुरू होणार आहे.’’
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘तेजस्विनी बाई, ममता पुजारी, अभिलाषा म्हात्रे, किशोरी शिंदे, कविता आणि प्रियांका यांच्यावर भारतीय संघाची प्रमुख मदार असेल. इन्चॉनमधील वातावरण आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन मग आम्ही आगामी व्यूहरचना रचू.’’
इराण, थायलंड यांच्यासारखे काही संघ अधिक कणखर झाले आहेत. याविषयी दडवे म्हणाल्या, ‘‘परदेशी संघांचे खेळाडू भारतीय खेळाडूंचा व्हिडीओ चित्रणाद्वारे अभ्यास करतात.  भारतीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शनसुद्धा आता काही देशांना मिळत असल्यामुळे त्यांचे संघ अधिक ताकदीने आशियाई स्पध्रेत खेळतील अशी आशा आहे.’’