चेक प्रजासत्ताकमधील तिसऱ्या मानांकित बाबरेरा क्रेजिकोव्हा व कॅटरिना सिनिआकोव्हा यांच्या जोडीने अमेरिकेच्या निकोल मेलिचार आणि चेक प्रजासत्ताकच्या क्वेता पेश्चके यांचा फडशा पाडून विम्बल्डन महिला दुहेरीच्या अजिंक्यपदाला गवसणी घातली. त्याचे हे वर्षांतील सलग दुसरे विजेतेपद ठरले. यंदाच्या फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपदही बाबरेरा व कॅटरिनाच्याच जोडीने मिळवले होते.

पहिल्या कोर्टवर झालेल्या या लढतीत त्यांनी मेलिचार व पेश्चकेचा ६-४, ४-६, ६-० असा अवघ्या एक तास २८ मिनिटांत पराभव केला. २००३ नंतर एकाच वर्षी फ्रेंच व विम्बल्डन अशा दोन्ही स्पर्धाचे विजेतेपद पटकावणारी ही पहिलीच जोडी ठरली. त्याशिवाय या २२ वर्षांच्या जोडीने ऑल इंग्लंड क्लबमधील मुली व महिला अशा दोन्ही गटांचे विजेतेपद मिळवले.

बाबरेराने हे विजेतेपद तिचे मार्गदर्शक नोव्होत्ना यांना समर्पित केले. २० वर्षांपूर्वीच नोव्होत्ना यांनी विम्बल्डनमधील महिला एकेरीचे विजेतेपद जिंकले होते. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये कर्करोगामुळे नोव्होत्ना यांचा मृत्यू झाला. फ्रेंच स्पर्धेप्रमाणेच विम्बल्डनच्या विजेतेपदाला गवसणी घातल्यावरदेखील बाबरेराने आकाशाच्या दिशेने पाहून हळुवारपणे हवेत चुंबन दिले.

‘‘मला आज फार आनंद होत असून स्वत:चा अभिमानही वाटत आहे. त्यांनाही माझा अभिमान वाटत असेल याची मला खात्री आहे,’’ असे बाबरेरा म्हणाली.