नशिबाचे फेरे सतत माणसाची कसोटी पाहत असतात, असाच अनुभव भारताच्या जीवन नेदुंचेझियनलाही आला. सहकाऱ्याच्या दुखापतीमुळे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील सहभागाचे स्वप्न दुरापास्त होण्याची शक्यता निर्माण झाली होती; मात्र अमेरिकन खेळाडू जेरिड डोनाल्डसनने दिलेल्या होकारामुळे त्याचे विम्बल्डन खेळण्याचे स्वप्न साकार होणार आहे.

जीवन हा विम्बल्डनच्या दुहेरीत हियोन चुंग याच्या साथीत खेळणार होता. या स्पर्धेद्वारे ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी त्याला मिळाली होती. मात्र चुंग याला दुखापत झाल्यामुळे जीवनची संधी हुकण्याची वेळ आली.

तथापि डोनाल्डसनने दुहेरीतील सहकारी म्हणून जीवनच्या नावावर शिक्कामोर्तब केले. दुहेरीत जीवनला जागतिक क्रमवारीत ९५ वे स्थान आहे तर डोनाल्डसनला ६५ वे मानांकन आहे. जीवन हा डावखुरा खेळाडू असल्यामुळेच डोनाल्डसनने त्याची निवड केली आहे.

जीवन हा सध्या ईस्टबोर्न येथील इगॉन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा मॅट रीड याच्या साथीत दुहेरीत सहभागी झाला आहे. जीवनने यंदाच्या मोसमातील चेन्नई ओपन स्पर्धेत रोहन बोपण्णाच्या साथीत विजेतेपद पटकाविले होते.

जीवन म्हणाला, ‘चुंग याने आपण दुखापतीमुळे माघार घेत असल्याचे मला कळविले. त्यामुळे विम्बल्डनची संधी गमावली जाणार या नैराश्येत मी सापडलो होतो. मात्र काही वेळानंतर  डोनाल्डसनकडून संदेश आल्यामुळे मी खूप आनंदी झालो. आता विम्बल्डनच्या तयारीवर लक्ष केंद्रित करीत आहे. बोपण्णा व फिटनेस प्रशिक्षक मनू वाजपेयी यांच्या प्रेरणेमुळेच माझा आत्मविश्वास वाढला आहे.’

जीवन व रीड यांचा फ्रेंच खुल्या स्पध्रेतील विजेत्यांना धक्का

भारताच्या जीवन नेदुंचेझियन आणि ऑस्ट्रेलियाच्या मॅट रीड या जोडीने एटीपी २५० इगॉन आंतरराष्ट्रीय टेनिस स्पध्रेत फ्रेंच खुली स्पध्रेतील विजेत्या रायन हॅरिसन आणि मिचेल व्हीनस या जोडीला पराभवाचा धक्का दिला. जीवन आणि रेड या बिगरमानांकित जोडीने सलामीच्या लढतीत अमेरिका आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंवर ६-३, ३-६, १०-७ असा विजय मिळवला.