विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत मरे-नदाल आणि फेडरर-जोकोव्हिच यांच्यातच लढती?

रॉजर फेडररसमोर तीन वेळा जेतेपदाची माळ गळ्यात टाकणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान असणार आहे.

roger-federer
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर

गतविजेत्या अँडी मरेला विम्बल्डन टेनिस स्पध्रेत अव्वल मानांकन मिळाले असून उपांत्य फेरीत त्याला येथे दोन वेळा जेतेपदाचा चषक उंचावणाऱ्या राफेल नदालचा सामना करावा लागणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत विम्बल्डनचे आठवे जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररसमोर तीन वेळा जेतेपदाची माळ गळ्यात टाकणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान असणार आहे.

सोमवारपासून सुरू होत असलेल्या या स्पध्रेत मरेला पहिल्याच फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश करणाऱ्या खेळाडूविरुद्ध खेळावे लागेल, तर दुसरा मानांकित जोकोव्हिच स्लोव्हाकियाच्या मार्टिन क्लिझानविरुद्ध स्पध्रेची सुरुवात करणार आहे. तिसऱ्या मानांकित फेडररला आणि चौथ्या मानांकित नदालला अनुक्रमे युक्रेनच्या अ‍ॅलेक्झांडर डोल्गोपोलोव्ह आणि ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

महिला गटात गतविजेत्या सेरेना विल्यम्स आणि माजी विजेत्या मारिया शारापोव्हा यांच्या अनुपस्थितीत जेतेपदाची शर्यत अधिक रंगतदार झाली आहे. अव्वल मानांकित अँजेलिक कर्बरला फ्रेंच आणि अमेरिकन खुल्या स्पध्रेतील माजी विजेत्या स्व्हेत्लाना कुझनेत्सोव्हाचा सामना करावा लागेल. दुसऱ्या मानांकित सिमोना हालेपसमोर जोहाना कोंटाचे आव्हान असेल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Wimbledon 2017 murray v nadal federer v djokovic likely to wimbledon semis