टेनिस विश्वातला अनभिषीक्त सम्राट अशी ओळख असलेल्या रॉजर फेडररचा चाहता वर्ग मोठा आहे. सध्या सुरु असलेल्या विम्बल्डन ओपन स्पर्धेत आपल्या पहिल्या फेरीचा सामना जिंकल्यानंतर फेडररने, आपल्या एका लहानग्या चाहतीची एक आगळीवेगळी इच्छा पूर्ण केली आहे. सामना संपल्यानंतर फेडररच्या ‘हेडबँड’ची (डोक्याला बांधायची पट्टी) मागणी करणाऱ्या मुलीला फेडररने लागलीच आपला हेडबँड काढून दिला. आपल्या आवडत्या खेळाडूकडून मिळालेली ही अमुल्य भेट पाहून त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंदही गगनात मावत नव्हता. फेडररने पहिल्या फेरीत सर्बियाच्या दुसान लाजोव्हिकवर ६-१, ६-३, ६-४ अशी मात केली.

१ तास १९ मिनीट चाललेल्या सामन्यानंतर परतत असताना फेडररने नेहमीप्रमाणे आपल्या चाहत्यांना ऑटोग्राफ दिल्या. यावेळी एक लहानगी मुलगी पोस्टर घेऊन फेडररचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत होती, सुरुवातीला चाहत्यांच्या गराड्यात असलेल्या फेडररला ती लहान मुलगी नेमकी कशाची मागणी करतेय हे समजलं नाही, मात्र ज्यावेळी त्याला मुलीच्या मागणीबद्दल समजलं फेडररने तात्काळ ती पूर्ण केली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.

लंडनमध्ये राहत असलेल्या भारतीय वंशाच्या अभिजीत जोशी यांची ही मुलगी असून, या घटनेनंतर त्यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आनंद व्यक्त करत रॉजर फेडररचे आभार मानले आहेत.