जगभरातील अनेक लोक विविध खेळाडूंना आपला आदर्श मानतात. मात्र, कधी-कधी हे खेळाडू मैदानावर आपले नियंत्रण गमावतात आणि गैरवर्तणूक करतात. सध्या सुरू असलेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतही अशीच एक घटना घडली. ऑस्ट्रेलियन टेनिसपटू निक किर्गिओसने प्रेक्षकांसोबत गैरवर्तन केले आहे. याची शिक्षा म्हणून त्याला १० हजार डॉलर्स म्हणजे अंदाजे ८ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. या स्पर्धेतील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड आहे. याशिवाय या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य १३ खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला आहे.

निक किर्गिओस सामन्यादरम्यान प्रेक्षकांवर थुंकला होता. स्पर्धेच्या पहिल्या फेरीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने याबाबत कबूली दिली होती. त्यानंतर त्याला ऑल इंग्लंड टेनिस क्लबने शिक्षा म्हणून दंड आकारला आहे. किर्गिओसच्या आधी, स्वीडिश टेनिसपटू अलेक्झांडर रिटशार्डला या स्पर्धेत पाच हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता.

हेही वाचा – VIDEO : सासुरवाडीमध्ये दादागिरी करणाऱ्या सुर्याची पत्नीने केली कानउघडणी

विशेष म्हणजे निकला दंड झाल्याचे अजिबात वाईट वाटलेले नाही. त्याने पत्रकार परिषदेत असेही सांगितले की, त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीत सुमारे ६.३ कोटी रुपये दंड भरला आहे. “माझ्यावर लावलेला प्रत्येक दंड धर्मादाय म्हणून वापरला जातो, त्यामुळे मला त्याचे वाईट वाटत नाही”, असे तो म्हणाला होता.

हेही वाचा – सचिन आणि युवराजने ‘अशा’ दिल्या लाडक्या भज्जीला शुभेच्छा; बघा व्हिडीओ

ऑल इंग्लंड टेनिस क्लबने विम्बल्डन स्पर्धेत भाग घेणाऱ्या इतर सात पुरुष टेनिसपटूंना प्रत्येक तीन हजार डॉलर्सचा दंड ठोठावला आहे. या खेळाडूंवर खेळ भावनेच्या विरुद्ध वर्तन किंवा अश्लील शब्द उच्चारल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. याशिवाय एकूण पाच महिला खेळाडूंनाही दंड ठोठावण्यात आला आहे. रॅकेट किंवा इतर उपकरणे फेकल्याबद्दल त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे.