लंडन : जगातील प्रतिष्ठित ग्रँडस्लॅमपैकी एक असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील ‘सेंटर कोर्ट’ला रविवारी १०० वर्षे पूर्ण झाली. लंडनमधील चर्च रोड परिसरात असलेल्या ऑल इंग्लंड लॉन टेनिस संघटनेच्या ‘सेंटर कोर्ट’वर १९२२ पासून सामने खेळवले जात आहेत. 

विम्बल्डन स्पर्धेतील रविवार हा परंपरेनुसार आरामाचा दिवस असतो. यंदा मात्र या नियमाला बाजूला सारत टेनिस सामने झाले आणि या दरम्यान ‘सेंटर कोर्ट’ची शंभरी साजरी करण्यासाठी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. ‘सेंटर कोर्ट’वर सामने खेळणे हे मानाचे मानले जाते. विम्बल्डनमधील मुख्य खेळाडूंचे, तसेच अंतिम फेरीचे सामने याच ‘सेंटर कोर्ट’वर खेळवले जातात. त्यामुळे रविवारी या कोर्टची शंभरी साजरी करण्यात आली, त्यावेळी रॉड लेव्हर, जॉन मॅकि न्रो, राफेल नदाल, गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच, अँडी मरे, ख्रिस एव्हर्ट, सिमोना हालेप आदी दिग्गज आणि माजी विजेते खेळाडू उपस्थित होते.

पुरुषांमध्ये विक्रमी आठ वेळा विम्बल्डनचे जेतेपद मिळवणारा फेडरर दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेत खेळत नसला, तरीही या कार्यक्रमात तो आवर्जून उपस्थित राहिला.