लंडन : दुसर्‍या सेटमध्ये विजयाजवळ असताना गमावलेले ‘ते’ पाच गुणच माझ्यासाठी प्रेरक ठरले, असे विम्बल्डन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळविणार्‍या चेक प्रजासत्ताकच्या लिंडा नोस्कोव्हाने पत्रकार परिषदेत सांगितले.

पहिल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदानंतर पत्रकार परिषदेला सुरूवात करतानाच मी किती मोठे यश मिळवले याची अद्याप जाणीव झालेली नाही असे नोस्कोव्हा म्हणाली. ‘‘कोर्टवरून बाहेर येऊन काहीच मिनिटे झाली आहे, असेच मला वाटत आहे. हा क्षण आयुष्यात कधीही विसरणार नाही. मी विम्बल्डन जिंकले हे समजायला मला अजून काही दिवस लागतील,’’ असे सांगितले.

‘‘दुसर्‍या सेटमध्ये विजय समोर दिसत असताना सलग पाच गुण गमावणे माझ्यासाठी कठीण होते. त्या महत्त्वाच्या क्षणी हात पाय गळून गेल्याची माझी भावना झाली होती. हालचालीच होत नव्हत्या. इतकी निराश कधीच झाली नव्हते. त्या गमावलेल्या पाच गुणांनंतर स्व्हिहस आणि पुढे जाऊन सेट हरल्यामुळे माझ्या निराशेत भर पडली होती. पण, त्याच गमावलेल्या पाच गुणांनी मी प्रेरित झाले आणि इतका मोठी मजल मारल्यावर विजेतेपदाशिवाय परतायचे नाही, असे मनाला बजावल्याचे नोस्कोव्हा म्हणाली.

दुसरा सेट गमाविल्यावर कुठलीही रणनिती बदलली नाही. एकाग्रता पुन्हा मिळविण्यासाठी मी कोर्टबाहेर गेले आणि चेहर्‍यावर थंड पाणी मारले आणि नव्याने खेळाला सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे तिसर्‍या सेटची सुरूवात झाल्यावर दडपण झुगारुन खेळ केला. या वेळी मॅच पॉइंट मिळाल्याचेच विसरून गेले आणि खेळत राहिले. त्यामुळेच मला गुण आणि विजेतेपद मिळवता आले, असे नोस्कोव्हाने सांगितले.