वृत्तसंस्था, लंडन

गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने दोन सेटच्या पिछाडीनंतर दमदार पुनरागमन करताना यानिक सिन्नेरवर सरशी साधत ११व्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तसेच स्पेनच्या २२ ग्रँडस्लॅम विजेत्या राफेल नदाल आणि अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झलाही आगेकूच करण्यात यश आले. महिलांमध्ये २०१९ची विजेती सिमोना हालेप आणि अमेरिकेच्या अमांडा अनिसिमोव्हाने उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मंगळवारी पुरुष एकेरीच्या सामन्यात अग्रमानांकित सर्बियाच्या जोकोव्हिचला इटलीच्या सिन्नेरविरुद्ध विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. मात्र, त्याने अनुभव पणाला लावताना सामन्यात ५-७, २-६, ६-३, ६-२, ६-२ अशी बाजी मारली. तीन तास आणि ३५ मिनिटे चाललेल्या या सामन्यात १०व्या मानांकित सिन्नेरने जोकोव्हिचला आपला सर्वोत्तम खेळ करण्यासाठी भाग पाडले. पहिले दोन सेट गमावल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचला लय सापडली. मग त्याने उर्वरित तीनही सेट मोठय़ा फरकांनी जिंकत विजयी घोडदौड कायम राखली.    

तत्पूर्वी, दुसऱ्या मानांकित नदालने नेदरलँड्सच्या बोटिक व्हॅन ड झाण्डशोल्पला ६-४, ६-२, ७-६ (८-६) असे नमवत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान सुनिश्चित केले. या फेरीत नदालचा ११व्या मानांकित फ्रिट्झशी सामना होईल. फ्रिट्झने उपउपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जेसन कुब्लेरचे आव्हान ६-३, ६-१, ६-४ असे परतवून लावले.

महिला एकेरीत १६व्या मानांकित रोमेनियाच्या हालेपने चौथ्या मानांकित स्पेनच्या पॉला बदोसाला ६-१, ६-२ असे सहज पराभूत केले. अन्य लढतीत, २० व्या मानांकित अनिसिमोव्हाने फ्रान्सच्या हार्मनी टॅनचा ६-२, ६-३ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत हालेप आणि अनिसिमोव्हा आमनेसामने येतील.

सनिया-मेटची आगेकूच

भारताची सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियन साथीदार मेट पाव्हिच यांनी विम्बल्डन स्पर्धेतील मिश्र दुहेरी गटाची उपांत्य फेरी गाठली आहे. सानिया-मेट या सहाव्या मानांकित जोडीने कॅनडाची गॅब्रिएला डाब्रोव्स्की आणि ऑस्ट्रेलियाचा जॉन पीर्स या चौथ्या मानांकित जोडीवर ६-४, ३-६, ७-५ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.