विम्बल्डन खुली टेनिस स्पर्धा : बार्टीला विम्बल्डन विजेतेपद

प्लिस्कोव्हाची कडवी लढत मोडीत काढत बार्टीने ६-३, ६-७ (४/७), ६-३ असा विजय मिळवत जेतेपद पटकावले.

प्लिस्कोव्हाला नमवून कारकीर्दीतील दुसऱ्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा

ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित अ‍ॅश्ले बार्टी हिने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हा हिचा संघर्षपूर्ण अंतिम लढतीत पाडाव करत विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर पहिल्यांदाच नाव कोरले. फ्रेंच खुल्या स्पर्धेनंतर (२०१९) बार्टीचे हे दुसरे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले.

प्लिस्कोव्हाची कडवी लढत मोडीत काढत बार्टीने ६-३, ६-७ (४/७), ६-३ असा विजय मिळवत जेतेपद पटकावले. मार्गारेट कोर्ट (१९६३, १९६५ आणि १९७०), इव्होनी गुलागाँग कावली (१९७१ आणि १९८०) यांच्यानंतर विम्बल्डनचे जेतेपद पटकावणारी बार्टी ही ऑस्ट्रेलियाची तिसरी महिला टेनिसपटू ठरली आहे.

बार्टीने पहिल्या सेटमध्ये सुरुवातीलाच दोन वेळा प्लिस्कोव्हाची सव्‍‌र्हिस मोडीत काढत ४-० अशी आघाडी घेतली होती. बार्टीचा खेळ बहरत असताना प्लिस्कोव्हाला गुण मिळवतानाही कठीण जात होते. बार्टी पहिला सेट सहजपणे जिंकणार असे वाटत असतानाच प्लिस्कोव्हाने दोन वेळा सव्‍‌र्हिस भेदत प्रतिकार केला. बार्टीने अखेर पहिला सेट ६-३ अशा फरकाने जिंकून सामन्यात आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटमध्ये दमदार खेळ करत प्लिस्कोव्हाने सामन्यात पुनरागमन केले. याही वेळी बार्टीने प्लिस्कोव्हाची सव्‍‌र्हिस मोडीत काढत ३-१ अशी आघाडी घेतली. पण प्लिस्कोव्हाने तिला चोख प्रत्युत्तर देत सामना ५-५ अशा बरोबरीत आणला. त्यानंतर बार्टीने प्लिस्कोव्हाची आणि मग प्लिस्कोव्हाने बार्टीची सव्‍‌र्हिस भेदत दुसरा सेट टायब्रेकरमध्ये नेला. अखेर टायब्रेकरमध्ये प्लिस्कोव्हाने ४-२ अशी आघाडी घेत सामन्यात बरोबरी साधली.

तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सुरुवातीलाच प्लिस्कोव्हाची सव्‍‌र्हिस भेदत बार्टीने ३-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर बार्टीने ४-१ अशी आगेकूच केली होती. प्लिस्कोव्हाने तिला लढत देण्याचा प्रयत्न केला, पण बार्टीने आपल्या सव्‍‌र्हिसवर गुण मिळवत तिसऱ्या सेटसह जेतेपद आपल्या नावावर केले.

अंतिम फेरीत काय होईल, या विचाराने मला काल रात्री झोपच लागली नाही. इव्होनी कावली यांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी साकारण्याची माझी इच्छा होती. आता जेतेपद मिळवल्याने मी आनंदी आहे. कॅरोलिना प्लिस्कोव्हाविरुद्ध खेळताना माझी खरी कसोटी लागली. – अ‍ॅश्ले बार्टी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wimbledon open tennis tournament akp 94

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी