scorecardresearch

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचची उपांत्यपूर्व फेरीत धडक

अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : जोकोव्हिचची उपांत्यपूर्व फेरीत धडक
( प्रतिनिधिक छायाचित्र )

सिन्नेरकडून अल्कराझ पराभूत; किरियॉस, जाबेऊर, रायबाकिनाची आगेकूच

वृत्तसंस्था, लंडन

अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पाचव्या मानांकित कार्लोस अल्कराझला मात्र १०व्या मानांकित यानिक सिन्नेरकडून पराभव पत्करावा लागला. उपांत्यपूर्व फेरीत जोकोव्हिच आणि सिन्नेर आमनेसामने येतील.

पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात गतविजेत्या जोकोव्हिचने नेदरलँड्सच्या टीम व्हॅन रायथोव्हेनवर ६-२, ४-६, ६-१, ६-२ अशी सरशी साधली. दोन तास आणि ३९ मिनिटे चाललेल्या या सामन्याची जोकोव्हिचने अप्रतिम सुरुवात केली. त्याने पहिला सेट चार गुणांच्या फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये रायथोव्हेनने दमदार पुनरागमन करताना अनपेक्षित विजय मिळवत सामन्यात बरोबरी साधली. यानंतर मात्र जोकोव्हिचने आक्रमक शैलीत खेळ करताना रायथोव्हेनवर दडपण टाकले.  त्याने अखेरचे दोन्ही सेट मोठय़ा फरकांनी जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.

अन्य लढतीत, जेतेपदासाठी दावेदार स्पेनच्या अल्कराझला इटलीच्या सिन्नेरने १-६, ४-६, ७-६ (१०-८), ३-६ असे तीन तास आणि ३५ मिनिटांत नमवले. सिन्नेरने प्रथमच विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाच्या निक किरियॉसने पाच सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत अमेरिकेच्या ब्रँडन नाकाशिमावर ४-६, ६-४, ७-६ (७-२), ३-६, ६-२ असा विजय नोंदवला. तर, चिलीच्या ख्रिस्टियन गारिनने ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स डी मिनाऊरवर २-६, ५-७, ७-६ (७-३), ६-४, ७-६ (७-६) अशी मात केली.

महिला एकेरीत तिसऱ्या मानांकित ओन्स जाबेऊरने २४व्या मानांकित बेल्जियमच्या एलिस मर्टेन्सचा ७-६ (११-९), ६-४ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. यासह जाबेऊरने सलग दुसऱ्यांदा विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठली. तसेच जर्मनीच्या जुल नेमायरने ब्रिटनच्या हेदर वॉटसनला

६-२, ६-४ असे पराभूत केले. कझाकस्तानच्या एलेना रायबाकिनाने क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिचला ७-५, ६-३ असे सरळ सेटमध्ये नमवत करत विजयी घोडदौड कायम राखली.

१३ विम्बल्डनची उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची जोकोव्हिचची ही १३वी वेळ ठरली. त्याने सहा वेळा जेतेपद पटकावले आहे.

उपांत्यपूर्व फेरीचे सामने

’ वेळ : दुपारी ३.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, २

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wimbledon tennis tournament djokovic semifinals sinner alcaraz defeated amy