विम्बल्डन टेनिस स्पर्धा : सेरेना पहिल्याच फेरीत गारद; पुरुषांमध्ये नदाल, जोकोव्हिच, त्सित्सिपास, तर महिलांमध्ये हालेप, आंद्रेस्कू, पेगुला विजयी

तब्बल ३६४ दिवसांनी टेनिस कोर्टावर पुनरागमन करणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

sp serena williams
सेरेना सलामीलाच गारद

वृत्तसंस्था, लंडन : तब्बल ३६४ दिवसांनी टेनिस कोर्टावर पुनरागमन करणाऱ्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सला विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. पुरुषांमध्ये विक्रमी २२ ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदाल, अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिच, चौथा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास, तर महिलांमध्ये १६वी मानांकित सिमोना हालेप, बियांका आंद्रेस्कू, जेसिका पेगुला यांना विजय मिळवण्यात यश आले.

२३ ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाला महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत फ्रान्सच्या हार्मनी टॅनकडून ५-७, ६-१, ७-६ (१०-७) अशी हार पत्करावी लागली. तीन तास आणि ११ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सेरेनाला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. बऱ्याच काळानंतर टेनिस खेळत असल्याने अखेरच्या काही गेममध्ये ४० वर्षीय सेरेनाला थकवा जाणवला. तसेच तिच्या खेळात नेहमीसारखी आक्रमकता दिसली नाही. तिने पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन केले. मग तिसऱ्या सेटमध्येही दोन्ही खेळाडूंनी झुंजार खेळ केल्याने ६-६ अशी बरोबरी झाली आणि विजेती ठरवण्यासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यात प्रथमच विम्बल्डनमध्ये खेळणाऱ्या टॅनने १०-७ अशी बाजी मारत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

महिलांमध्येच रोमेनियाच्या हालेपने चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना मुचोव्हाचा ६-३, ६-२ असा पराभव केला. अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या माजी विजेत्या आंद्रेस्कूने एमिना बेक्तासचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडवला. अमेरिकेच्या पेगुलाने क्रोएशियाच्या डॉना व्हेकिचवर ६-३, ७-६ (७-२) अशी मात केली. 

पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत स्पेनचा तारांकित टेनिसपटू नदालने फ्रान्सिस्को सेरून्डोलावर ६-४, ६-३, ३-६, ६-४ अशी सरशी साधली. ग्रीसच्या त्सित्सिपासने स्वित्र्झलडच्या अलेक्झांडर रिट्सचार्डवर ७-६ (७-१), ६-३, ५-७, ६-४ अशी मात केली. सहाव्या मानांकित फेलिक्स ऑगर-अ‍ॅलिसिमेने मात्र अमेरिकेच्या मॅक्सिम क्रेसीकडून ७-६ (७-५), ४-६, ६-७ (९-११), ६-७ (५-७) असा पराभव पत्करला. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात गतविजेत्या जोकोव्हिचने ऑस्ट्रेलियाच्या थानासी कोकिनाकिसला ६-१, ६-४, ६-२ अशी सरळ सेटमध्ये धूळ चारली.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा माझ्या खेळात सुधारणा होती, ही एक सकारात्मक बाब. मी पुन्हा विम्बल्डनमध्ये खेळणार का, हे सांगणे अवघड आहे. मी आता कोणत्या स्पर्धेमध्ये खेळेन हे मलाही ठाऊक नाही. 

– सेरेना विल्यम्स

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wimbledon tennis tournament tennis court champions championship ysh

Next Story
मलेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, कश्यपची विजयी सलामी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी