वृत्तसंस्था, लंडन : पाचव्या मानांकित स्पेनच्या कार्लोस अल्कराझ गार्फियाने विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत संघर्षपूर्ण विजयाची नोंद केली. तसेच पुरुषांमध्ये तीन ग्रँडस्लॅम विजेता अँडी मरे, यानिक सिन्नर आणि रायली ओपेल्का यांना, तर महिलांमध्ये अग्रमानांकित इगा श्वीऑनटेक आणि मारिया सक्कारी यांनाही दुसरी फेरी गाठण्यात यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९ वर्षीय अल्कराझने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील चुरशीच्या लढतीत जर्मनीच्या यान-लेनर्ड स्ट्रुफवर ४-६, ७-५, ४-६, ७-६ (७-३), ६-४ अशी सरशी साधली. तब्बल चार तास आणि ११ मिनिटे रंगलेल्या या लढतीत दोन्ही खेळाडूंनी झुंजार खेळ केला. मात्र पिछाडीनंतर अल्कराझने अखेरचे दोन्ही सेट जिंकत आगेकूच केली.  

तसेच ब्रिटनचा ३५ वर्षीय खेळाडू मरेने ऑस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थचा ४-६, ६-३, ६-२, ६-४ असा पराभव केला. १०व्या मानांकित इटलीच्या सिन्नरने माजी ग्रँडस्लॅम विजेत्या स्वित्र्झलडच्या स्टॅनिस्लास वॉविरकावर ७-५, ६-४, ६-३, ६-२ अशी मात केली. १५व्या मानांकित अमेरिकेच्या ओपेल्काने स्पेनच्या कार्लोस ताबेर्नेरला ७-६ (७-५), ६-४, ६-४ असे सरळ सेटमध्ये नमवले. १८व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्हला पायाच्या दुखापतीमुळे स्टिव्ह जॉन्सनविरुद्धचा सामना अर्ध्यातच सोडावा लागला. दिमित्रोव्हने पहिला सेट ६-४ असा जिंकल्यानंतर जॉन्सन दुसऱ्या सेटमध्ये ५-२ असा आघाडीवर होता. मात्र त्यानंतर त्याने सामन्यातून माघार घेतल्याने अमेरिकेच्या जॉन्सनला पुढे चाल मिळाली.

दुसरीकडे, फ्रेंच खुल्या स्पर्धेतील विजेत्या श्वीऑनटेकने महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत क्रोएशियाच्या याना फेटचे आव्हान ६-०, ६-३ असे परतवून लावले. पाचव्या मानांकित ग्रीसच्या सक्कारीने ऑस्ट्रेलियाच्या झो हाइव्जला ६-१, ६-४ अशी धूळ चारली. १२व्या मानांकित ओस्तापेंकोने फ्रान्सच्या डोडिनवर ६-४, ६-४ अशी मात केली. याचप्रमाणे ११व्या मानांकित अमेरिकेच्या गॉफने रोमेनियाच्या एलेना-गॅब्रिएला रूसवर ६-२, ६-३, ७-५ असा निसटता विजय मिळवला. चौथ्या मानांकित स्पेनच्या बदोसाने अमेरिकेच्या लुइसा चिरिकोला ६-२, ६-१ असे नमवले.

बेरेट्टिनीची माघार

करोनाची बाधा झाल्यामुळे आठव्या मानांकित माटेओ बेरेट्टिनीने विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेतली आहे. गतउपविजेत्या बेरेट्टिनीचा पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत चिलीच्या ख्रिस्टियन गारिनशी सामना रंगणार होता. ‘‘करोना चाचणीचा अहवाल सकारात्मक आल्यामुळे मला विम्बल्डनमधून माघार घ्यावी लागते आहे. मला ही घोषणा करताना अतिशय दु:ख होत आहे,’’ असे बेरेट्टिनीने ‘इन्स्टाग्राम’वर लिहिले. यापूर्वी क्रोएशियाच्या मरिन चिलिचलाही करोनाची बाधा झाल्यामुळे या स्पर्धेत खेळता आले नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wimbledon tennis tournament victory men women second round ysh
First published on: 29-06-2022 at 00:02 IST